हार्णे अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याची भीती

मुंबई : प्रश्नपत्रिकेतील चुकांचा फटका आणि फेरतपासणीतील घोळाविरोधात बी. आर. हार्णे अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्थापत्य शाखेचे (सिव्हिल इंजिनियरिंग) चार विद्यार्थी महाविद्यालय व विद्यापीठाच्या दारात न्यायासाठी लढत आहेत. यातील एका विद्यार्थ्यांचा एक प्रश्नच तपासला गेला नव्हता तर अन्य विद्यार्थ्यांचे गुण फेरतपासणीत कमी करण्यात आल्याने वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी या प्रश्नात लक्ष घालून मुंबई विद्यापीठाला तात्काळ चौकशी करून निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सौरभ, सिद्धांत, ऋषीकेश व शुभम या विद्यार्थ्यांची सिव्हिल इंजिनियरिंग या अभ्यासक्रमाची दुसऱ्या वर्षांतील चौथ्या सत्राची अ‍ॅनालिसीस-१ या विषयाची शेवटची संधी परीक्षा (गोल्डन चान्स) मे २०१८ मध्ये पार पडली. शेवटची संधी असल्यामुळे या विषयात उत्तीर्ण होणे आवश्यक होते. मात्र गुणपत्रितेत नापासाचा शेरा मिळाल्यामुळे या पेपरच्या फेरमुल्यांकनासाठी त्यांनी अर्ज केला. तेथेही नापास शेरा कायम राहिल्यामुळे या विद्यार्थ्यांनी उत्तर पत्रिकेची छायांकित प्रत मिळवून या विषयातील तीन तज्ज्ञांकडून उत्तर पत्रिका तपासून घेतली  आणि महाविद्यालयाच्या प्राचार्याकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हे विद्यार्थी विद्यापीठाच्या ग्रिव्हन्स समितीकडेही गेले. मात्र महाविद्यालयात आलेल्या ग्रिव्हन्स समितीत अ‍ॅनालिसीस-१ या विषयाचे तज्ज्ञच नसल्याचे उघड झाले. परिणामी या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे संचालक व प्रकुलगुरुंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना समाधानकारक उत्तर मिळू शकले नाही.

याप्रकरणी भाजपचे आमदार संजय केळकर यांनीही विद्यापीठाच्या कुलगुरुंना पत्र पाठवून या विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेण्याची विनंती केली. विद्यापीठात तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाते डॉ. सुरेश उकरंडे यांनी दोन दिवसात बैठक लावून या विद्यार्थ्यांचे मुद्दे तपासून पाहण्याचा निर्णय घेतला आहे.

महाविद्यालयातील सुविधा तपासा-आमदार केळकर

बी.आर. हर्णे अभियांत्रिकी महाविद्यालयात एआयसीटीईच्या निकषानुसार पुरेसे पात्र शिक्षक व आवश्यक त्या सुविधा आहेत का, याचीही तपासणी करण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी राज्याचे तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. डॉ. अभय वाघ यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता हा विषय विद्यापीठाच्या अखत्यारितील असला तरी आपण विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच मुंबई विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. उकरंडे यांच्याशी बोलून विद्याथ्र्यी खरोखर उत्तीर्ण असतील तर त्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी पाठपुरावा करू असे सांगितले.