निलंबित आमदारांचा मुख्यमंत्र्यांसमोर टाहो!
वरळी वाहतूक शाखेतील पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना विधान भवनाच्या आवारात केलेली बेदम मारहाण बुधवारी पाच आमदारांना चांगलीच भोवली. विधिमंडळातून बाहेर पडताच या आमदारांना ताब्यात घेण्यासाठी बाहेर ताटकळणाऱ्या पोलिसांपासून बचाव करण्यासाठी या आमदारांनी मुख्यमंत्र्यांसमोर अक्षरश टाहो फोडला. अखेर रात्रीपुरती अटकेची कारवाई टळावी, यासाठी मुख्यमंत्र्यांना मध्यस्थी करावी लागली.
बहुजन विकास आघाडीचे नालासोपारा विधानसभा मतदार संघाचे आमदार क्षितीज ठाकूर यांच्याशी पोलीस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी उद्धट वर्तन केल्याचा मुद्दा मंगळवारी विधानसभेत गाजला होता. मनसेचे राम कदम, बहुजन विकास आघाडीचे क्षितीज ठाकूर, शिवसेनेचे राजन साळवी, अपक्ष आमदार प्रदीप जैस्वाल आणि भाजपचे जयकुमार रावळ या आमदारांनी सूर्यवंशी यांना विधानभवनाच्या गॅलरीतच मारहाण केली आणि विधिमंडळाच्या इतिहासात प्रथमच विधानसभाध्यक्षांनी राज्याची माफी मागितली. या आमदारांवर कठोर कारवाई करण्याचे मंगळवारीच मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल्यानंतर बुधवारी या आमदारांना ३१ डिसेंबपर्यंत निलंबित करण्यात आले व लगेचच त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी आवारातच सापळा लावला.   
अटक टाळण्यासाठी या आमदारांनी भाजपाचे प्रतोद गिरीश बापट आणि मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांना घेऊन ‘बाबा आम्हाला वाचवा’ असे म्हणत थेट मुख्यमंत्र्यांना साकडे घातले. आजची रात्र अटकेपासून वाचवा, उद्या आम्ही  पोलिसांना शरण  जाऊ, असे आर्जव करीत या आमदारांनी मुख्यमंत्री कार्यालयात ठाण मांडले होते. शेवटी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पोलीस महासंचालक संजीव दयाळ आणि पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांना पाचारण करून रात्री त्यांना अटक करू नका, अशी सूचना केली.