आज (रविवार) सकाळी साडेनऊच्या सुमारास मातोश्रीवरून निघालेली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची अंत्ययात्रा सहा तासांच्या प्रवासानंतर  दादर येथील सेनाभवन परिसरात दाखल झाली आहे. लाखो शिवसैनिकांच्या साक्षीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची अंत्ययात्रा गेले सहा तास सुरू असून महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून शिवसैनिक मुंबईत दाखल झाले आहेत. कलानगर ते शिवाजी पार्क पर्यंतचा सर्व परिसरात जनसागर लोटला असून आपल्या लाडक्या शिवसेनाप्रमुखांचे अंत्यदर्शन घेता यावे यासाठी प्रत्येकजण आज रस्त्यावर उतरला आहे. विशेष म्हणजे लाखो लोकांचा जनसमुदाय असूनही अद्याप एकही वाईट घटना घडल्याचे वृत्त नाही. अतिशय शिस्तबध्द पध्दतीने बाळासाहेबांची अंत्ययात्रा निघाली असून अनेकांना आपला शोक अनावर झाल्याचे चित्र जागोजागी दिसत आहे.
सर्व ठाकरे कुटुंबीय, शिवसेनेचे पदाधिकारी, नेते, अनेक मान्यवर आणि राज्यभरातून आलेल्य़ा हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीत अतिशय शोकाकूल वातावरणात आज सकाळी ‘मातोश्री’वरून बाळासाहेबांच्या अंत्ययात्रेला सुरूवात झाली. शिवसेनाप्रमुखांच्या पार्थिवाला तिरंग्याचं आवरण करण्यात आलं असून बाळासाहेबांचे पार्थिव ‘मातोश्री’बाहेर आणल्यानंतर संर्वप्रथम त्यांना पोलिसांकडून शासकीय इतमामात मानवंदना देण्यात आली.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पार्थीव सर्वप्रथम दादर येथील शिवसेना भवन येथे ठेवण्यात येणार असून त्यानंतर ते जनसामांन्यांना दर्शनासाठी शिवाजी पार्कवर ठेवण्यात येणार आहे. शिवाजी पार्क मैदानावर बाळासाहेबांचे पार्थीव सायंकाळी ५ वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता शिवतीर्थावरच शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
शिवाजी पार्कवर बाळासाहेबांच्या अंत्यदर्शनासाठी सकाळपासूनच लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दरम्यान, बाळासाहेबांच्या अंत्यदर्शनासाठी राज्यभरातून २० लाखांहून अधिक शिवसैनिक आल्याचे पोलिसांतर्फे सांगण्यात आले आहे.
मातोश्रीवरून निघालेल्य़ा बाळासाहेबांच्या अंत्ययात्रेमधील शिवसैनिक शिवाजी पार्कच्या दिशेने जाताना ‘जय जय जय जय जय भवानी, जय जय जय जय शिवाजी’ आणि ‘आला रे आला, आला रे आला, शिवसेनेचा वाघ आला’ या घोषणांनी आसमंत दुमदुमुन टाकत आहेत.