स्वरराजचा राज ठाकरे कसा झाला ते मनसे अध्यक्ष  राज ठाकरेंनी आज एका कार्यक्रमात उलगडून सांगितले. बालदिनानिमित्त ‘एबीपी माझाचा’ विशेष कार्यक्रम, ‘ऐसपैस गप्पा राजकाकांशी’ या कार्यक्रमात राज ठाकरेंनी आपल्या लहानपणीच्या अनेक गोष्टींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी अनेक मज्जेदार किस्से सांगितले.

आपल्याला राज ठाकरे हे नाव बाळासाहेबांनी दिलं, अशी आठवण त्यांनी यावेळी सांगितली. ‘मी सुरुवातीला स्वरराज ठाकरे नावानं व्यंगचित्रं काढायचो. व्यंगचित्रातील माझ्या कारकिर्दीची सुरुवात त्याच नावानं झाली होती. मात्र सहा-आठ महिन्यांतच मला बाळासाहेबांनी नावात बदल करायला सांगितला. मी व्यंगचित्राच्या क्षेत्रातील कारकीर्द बाळ ठाकरे नावानं सुरू केली. त्यामुळे तू राज ठाकरे नावानं व्यंगचित्रं काढ, असं बाळासाहेबांनी मला सांगितलं आणि माझ्या नावाचं बारसं झालं,’ अशी आठवण राज ठाकरेंनी सांगितली.

शाळेत असताना माझ्यावर कुठलीही जबाबदारी नव्हती. मला दहावीला फक्त पास व्हायला सांगितल होतं. दहावीला मला फक्त ३७ टक्के मिळाले होते असा खुलासा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. तुमचा आवडता विषय कोणता? या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले की, शाळेत असताना चित्रकला आवडता विषय होता, त्यानंतर मराठी, इतिहास भूगोल आणि हिंदी आवडता विषय होता. चौथीनंतरच्या प्रगतीपुस्तकावर बाळासाहेबांची सही होती असेही राज ठाकरे म्हणाले. शाळेत असताना खोट बोलत होतात का? चिमुकल्याच्या या प्रश्नावर स्मितहास्य करत राज ठकारे म्हणाले की, ‘ शाळेत असताना खूप खोट बोलायचो पण आता सरकार बोलत तसं नाही.’