बाळासाहेबांचा दबदबा इतका मोठा होता की, त्यांना भेटण्यासाठी सामान्य कार्यकर्त्यांपासून ते देशाच्या राष्ट्रपतीपर्यंत सर्वजण मातोश्रीवर जात. आज अमूकने ‘मातोश्री’वर जाऊन बाळासाहेबांची भेट घेतली, चर्चा केली, अशाच बातम्या वाचायची सवय महाराष्ट्राला आहे. बाळासाहेब ‘मातोश्री’ बाहेर पडून कुणाला भेटायला गेले आहेत, याची कधी कुणी -निदान अलीकडच्या काळात तरी-कल्पनाही केली नसेल. याला दुसरेही एक कारण होते, बाळासाहेब अतिरेक्यांच्या हिट लिस्टवर होते. त्यामुळे त्यांनी अलीकडच्या काळात ‘मातोश्री’ बाहेर पडणे थांबवले होते..आणि शिरस्ताच असा होता की, महाराष्ट्राच्या कुणी देश पातळीवर-आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळवलंय, कुणाला राजकीय चर्चा करायचीय वा कुणाला केवळ सदिच्छा भेट घ्यायचीय, सर्वाची पावलं ‘मातोश्री’च्या दिशेनं वळत. बाळासाहेबांच्या भेटीचं हे गारुड जनसामान्यांपासून थोरामोठय़ांपर्यंत सर्वाना होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुरुंगातून बाहेर येताच थेट ‘मातोश्री’वर पोहोचला होता संजय दत्त, बाळासाहेबांना मिठी मारली अन्…

..पण गेल्या वर्षी याच महिन्यात, २५ नोव्हेंबर रोजी एक नवल घडलं. या दिवशी बाळासाहेबांनी पुण्यात जाऊन ख्यातनाम व्यंग्यचित्रकार आर. के. लक्ष्मण यांची भेट घेतली. त्यांची प्रकृतीची विचारपूस केली. तेव्हा ८५ वर्षांच्या बाळासाहेबांनी महिन्यापूर्वीच ९०व्या वर्षांत पर्दापण केलेल्या लक्ष्मण आणि त्यांच्या पत्नी कमला यांच्याशी काही वेळ गप्पा मारल्या, जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्या वेळी बाळासाहेबांना लक्ष्मण यांच्याविषयी वाटणारा आदर पत्रकारांशी बोलतानाही जाणवत होता.

बाळासाहेब ठाकरे दहशतवादी नव्हते का?- मुशर्रफ

बाळासाहेब आणि लक्ष्मण यांची पहिली भेट झाली होती, ती १९४५ साली. तेव्हा बाळासाहेब फ्री प्रेस जर्नलमध्ये कार्टुनिस्ट म्हणून काम करत होते. तिथे काही दिवसांनी लक्ष्मणही काटरुनिस्ट म्हणून जॉइन झाले. सुमारे पाच र्वष बाळासाहेब आणि लक्ष्मण यांनी सोबत काम केलं. १९५०साली लक्ष्मण ‘फ्री प्रेस’ सोडून ‘टाइम्स ऑफ इंडिया’मध्ये जॉइन झाले, काही दिवसांनी बाळासाहेबांनीही ‘फ्री प्रेस’ सोडला. पण त्यांचे लक्ष्मण यांच्याशी असलेले संबंध कायम राहिले. नंतरच्या काळात लक्ष्मण यांनी व्यंगचित्रकलेमध्ये मोठी कीर्ती मिळवली. त्यांचा ‘कॉमन मॅन’ तर अनेकांचा सहोदर झाला. त्याचा ठाकरे यांनाही अभिमान होता. या भेटीत लक्ष्मण यांनी त्या ‘कॉमन मॅन’ चेच चित्र बाळासाहेबांना भेट दिलं. ते मोठय़ा अभिमानाने पत्रकारांना दाखवत ते म्हणाले, ‘आता फक्त मी बोलू शकतो, लक्ष्मण बोलू शकत नाही.’ २०१० साली आलेल्या पक्षाघातामुळे लक्ष्मण बोलू शकत नाहीत. आपल्या आपल्या काळातल्या व्यंगचित्रांविषयी बोलताना ते म्हणाले, ‘आज कॅरिकेचर्सचा दर्जा घसरला आहे. आमच्या काळी एक व्यंगचित्र शंभर संपादकीयांच्या तोडीचं असायचं. आजच्या व्यंगचित्रामध्ये ते दिसत नाही.’
दुर्दैवानं या दोन श्रेष्ठ व्यंगचित्रकारांची ती भेट शेवटचीच ठरली..

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Balasaheb thackeray when meet r k laxman
First published on: 18-11-2012 at 12:44 IST