बेकायदा बांधकामांना संरक्षण मिळावे यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसह शिवसेनेने पुकारलेल्या ‘ठाणे बंद’चा सर्वसामान्य ठाणेकरांनी फज्जा उडविला. दळणवळणाच्या पुरेशा सुविधा उपलब्ध नसतानाही सकाळपासूनच ठाणे, कळवा, मुंब्रा परिसरातील चाकरमान्यांनी पायी जात रेल्वे स्थानक गाठले. या शहरांमधील रस्त्यांवर शुकशुकाट पसरावा यासाठी राजकीय नेते अक्षरश जंग जंग पछाडताना दिसले. बसथांब्यांवर प्रवाशांच्या रांगा लागल्याचे पाहून एकनाथ शिंदे, राजन विचारे, जितेंद्र आव्हाड या आमदारांच्या त्रिकुटाने टीएमटीच्या वागळे आगारात ठाण मांडत एकही बस तेथून बाहेर पडू दिली नाही. चाकरमान्यांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी टीएमटीच्या १२, तर १३ खासगी वाहनांची तोडफोड करण्यात आली. काही ठिकाणी रिक्षाचालकांना चोप देण्यात आला. शिवसेनेचे काही नगरसेवक टीएमटीच्या बसेसवर दगडफेक करत असल्याचे धक्कादायक दृश्यही यावेळी दिसले.
या बंदमध्ये भारतीय जनता पक्ष तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते मात्र सहभागी झाले नव्हते. शिंदे आणि आव्हाडांचा अभद्र हट्टाग्रह मोडून काढण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी वागळे आगारात प्रवेश करून तेथील बसेस पोलीस संरक्षणात बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी बसेस आगाराबाहेर काढण्याऐवजी शिंदे-विचारेंसोबत गप्पा कुटत बसलेले ठाणे परिवहन उपक्रमाचे व्यवस्थापक देविदास टेकाळे यांच्या केबिनची काच मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी फोडली. मात्र, आमदार शिंदे यांनी ‘आवाज’ देताच मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष नीलेश चव्हाणांसह त्यांचे कार्यकर्ते केबिनबाहेर पडले.
पोलीस संरक्षणात बसेस आगाराबाहेर काढण्यात येतील, अशा बाता एकीकडे मारल्या जात असताना आक्रस्ताळी आमदारांना पोलिसांची साथ लाभली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या दमबाजीमुळे शहरातील प्रमुख बाजारपेठा मात्र सायंकाळपर्यंत बंद होत्या. त्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवरील व्यवहार काहीसे थंडावल्याचे चित्र होते. मात्र, त्यामध्ये उस्फूर्तता दिसून येत नव्हती. ऐन परीक्षांच्या हंगामात जोरजबरदस्तीने हा बंद करण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे हाल झाले. ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालयातील काही परीक्षा त्यामुळे रद्द करत असल्याचे व्यवस्थापनाने जाहीर केले.
बंदची हानी
* टीएमटीच्या १२ गाडय़ा फोडल्या
* १३ खासगी गाडय़ांवर दगडफेक
* टीएमटीच्या सहा बसेसची हवा काढली
* रिक्षाचालकांना मारहाण
संग्रहित लेख, दिनांक 19th Apr 2013 रोजी प्रकाशित
ठाणेकरांचा ‘बंद’ला दणका!
बेकायदा बांधकामांना संरक्षण मिळावे यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसह शिवसेनेने पुकारलेल्या ‘ठाणे बंद’चा सर्वसामान्य ठाणेकरांनी फज्जा उडविला. दळणवळणाच्या पुरेशा सुविधा उपलब्ध नसतानाही सकाळपासूनच ठाणे, कळवा, मुंब्रा परिसरातील चाकरमान्यांनी पायी जात रेल्वे स्थानक गाठले. या शहरांमधील रस्त्यांवर शुकशुकाट पसरावा यासाठी राजकीय नेते अक्षरश जंग जंग पछाडताना दिसले.

First published on: 19-04-2013 at 04:36 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bandh a failure in thane except minor buses damaged