अवैध झोपडय़ांना मलबार हिलवरील सदनिकांएवढा भाव

अतिशय दाटीवाटीने एकमेकांना खेटून उभ्या करण्यात आलेल्या पत्र्याच्या झोपडय़ांनी व्यापलेले गरीबनगर ही मुंबईतील सर्वात बकाल वस्ती मानली जाते. या बकाल वस्तीत राहणे तर दूरच, पण जाणेही कुणा मध्यम किंवा उच्चवर्गीयाला नकोसे वाटेल. पण या गरीबनगरातील घरांचे दर ऐकले तर कुणाचीही झोप उडेल. वांद्रे स्थानकाच्या पूर्वेकडे अनधिकृतपणे वसलेल्या या झोपडपट्टीतील घास बाजार भागातील एक शंभर फुटांची खोली तब्बल ९६ लाखांना विकली गेली. दक्षिण मुंबईतील मलबार हिल, कफ परेड, कुलाबा या भागांत ४५ ते ६५ हजार रुपये प्रति चौरस फूट दराने सदनिका विक्रीला उपलब्ध असताना, घास बाजारातील या खोलीचा प्रति चौरस फूट दर ९६ हजार रुपये इतका  होत आहे.

वांद्रे स्थानकाच्या पूर्वेकडे विविध कारणांसाठी आरक्षित ठेवण्यात आलेल्या शासकीय भूखंडांवर वर्षांनुवर्षे अतिक्रमण करून अनधिकृत झोपडय़ा उभारण्यात आल्या आहे. यातलाच एक भाग गरीबनगर. तळमजल्यावर पक्क्या भिंतींची खोली आणि त्या खोलीवरच रातोरात पत्रे ठोकून चढवलेले मजले असे चित्र गरीबनगरात सर्रास पाहायला मिळते. या वस्तीत राहणाऱ्यांची संख्या लक्षणीय असली तरी येथे अनेक कुटिरोद्योग चालतात. तळमजल्यावर कुटुंबाचे वास्तव्य आणि त्यावरील माळय़ांवर कपडे, चप्पट-बूट, पडदे निर्मितीचे छोटेछोटे कारखाने अशी येथील रचना आहे.

गरीबनगरच्या समोरच्या बहुमजली झोपडपट्टीत कच्चा माल साठवून ठेवणारी गोदामे आहेत. तिथला माल घेऊन गरीबनगरमधील कारखान्यांमध्ये उत्पादन घेतले जाते. गरीबनगरचा वाढीव भाग घास बाजार म्हणून ओळखला जातो. गेल्या काही वर्षांमध्ये घास बाजार तयार कपडय़ांची घाऊक बाजारपेठ म्हणून नावारूपाला आला. गरीबनगरमध्ये तयार होणारे कपडे या बाजारपेठेत आणून विकले जातात. येथील रोजची उलाढाला लाखोंच्या घरात आहे.

बिजनोर, अलीगढ, मेरठ येथील कारागीर या वस्तीत मोठय़ा संख्येने आहेत. गावची मालमत्ता विकून आलेले पैसे इथे गुंतवतात. ऐपत असेल तर झोपडय़ा विकत घेतात, नसेल तर भाडय़ाने घेत कापडउद्योग किंवा कारखाना सुरू करतात. गरीबनगरात झोपडीच्या एका माळ्याचे भाडे १० ते १५ हजार रुपये आहे. घास बाजारात मोक्याच्या ठिकाणी म्हणजेच रस्त्याला लागून असलेल्या शंभर, सव्वाशे चौरस फुटांच्या झोपडीसाठी महिन्याला ६० ते ७० हजार रुपये भाडे मोजावे लागते. चोरून घेतलेली वीज, पाणी जोडणी आणि त्या मानाने मुबलक जागा, सोबत शेजारीच असलेली घास बाजारातली मोठी बाजारपेठ यामुळे गरीबनगरातल्या झोपडय़ांचे दर जास्त आहेत. इथल्या एका बहुमजली झोपडीचा सौदा साधारण २० ते २५ लाखांना होतो. काही दिवसांपूर्वीच घासबाजारातील एक बहुमजली घर तब्बल ९६ लाखांना विकले गेल्याचेही उघड झाले आहे.

सरकारी यंत्रणांचे अभय

एखाद्याने मनात आणले तर चार दिवसांत या ठिकाणी चार मजली झोपडी बांधून तयार होते. पण या चार दिवसांत सरकारी यंत्रणांना अजिबात पत्ता लागत नाही. ‘स्कायवॉकखाली सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आला आहे. निर्मलनगर पोलीस ठाण्यात या कॅमेऱ्याचे चित्रण दिसते. स्थानकाशेजारीच पोलिसांची व्हॅन अहोरात्र उभी असते. त्यामुळे अशी झोपडी बांधण्यात येत असताना पोलिसांना याची माहिती समजणार नाही, हे पटणे अशक्य आहे,’ असे येथील एका रहिवाशाने सांगितले. इथे संघटित टोळ्या नाहीत. पोलीस ठाणे, महापालिकेचे विभाग कार्यालय ‘मॅनेज’ करण्याचे कसब ज्याच्याकडे आहे अशा काही व्यक्ती झोपडय़ा बांधतात. शिवाय त्या पाडल्या जाऊ नयेत म्हणून काही राजकारणी सहकार्य करतात, अशी माहिती अन्य एका रहिवाशाने दिली.

पालिकेला पाडकामासाठी पोलीस बंदोबस्त आवश्यक असतो. पण हा बंदोबस्त मिळू नये याची काळजी रीतसर निर्मलनगर पोलीस ठाण्याकडून घेतली जाते. शहरात भूखंड कोणत्याही शासकीय यंत्रणेचा असो, अवैध बांधकाम रोखण्याचे, पाडण्याचे अधिकार पालिकेला आहेत. मात्र गरीबनगर परिसरात पालिका आपले अधिकार वापरताना दिसत नाही.

अखिल चित्रे, मनसेचे उपविभाग अध्यक्ष