मुंबईः भारतीय पारपत्रावर थायलंडला गेलेल्या बांग्लादेशी नागरिकाला सहार पोलिसांनी अटक केली. आरोपीविरोधात लुक आऊट सर्कुलर जारी करण्यात आले होते. त्या आधारे विमानतळावर त्याला पकडण्यात आले. आरोपीने गोव्यात बनावट कागदपत्र सादर करून पारपत्र बनवल्याचे चौकशीत उघड झाले आहे. याबाबत सहार पोलीस अधिक तपास करीत आहेत.
जॉय बबलू चौधरी ऊर्फ जिकू दास असे अटक आरोपीचे नाव आहे. तो बांग्लादेशातील चित्तागोंग येथील रहिवासी आहे. आरोपीने गोव्यातील मोरजे येथून बनावट पारपत्र तयार केले होते. त्याद्वारे तो परदेशात प्रवास करत होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर एफआरआरओ विभागाने त्याच्याविरोधात लुक आऊट सर्कुलर जारी केले होते. अखेर आरोपी बँकॉकवरून भारतात परतल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या मोबाइलमध्ये आधारकार्डची २५ छायाचित्रे सापडली.
हेही वाचा – “सरकारवर सत्तेच्या नशेचा अंमल ‘कुत्ता गोली’प्रमाणे…”; ठाकरे गटाचा हल्लाबोल
आरोपीने भारतात झारखंड, छत्तीसगड येथील पत्त्यावर आधारकार्ड बनवले असल्याचे निष्पन्न झाले. अखेर इमिग्रेशन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला सुरक्षा रक्षकांच्या मदतीने सहार पोलिसांच्या ताब्यात दिले. आरोपीविरोधात बनावट पारपत्र तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.