एटीएम केंद्रांबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे आणि केंद्रातील बंद कॅमेरे डिसेंबर अखेपर्यंत सुरू करा, असे आदेश गृहाराज्यमंत्री सतेज पाटील यांनी बँकाना दिले आहेत. सुरक्षाविषयक सूचना न पाळणाऱ्या बँकाची एटीएम केंद्रे बंद केली जातील, असा इशाराही त्यांनी दिला.
एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेलेल्या महिलेवर बेंगळुरूत हल्ला झाला होता. त्या पाश्र्वभूमीवर सतेज पाटील यांनी मंगळवारी वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि बँकेचे अधिकारी यांची बैठक घेतली. या बैठकीत पाटील यांनी एटीएम केंद्राच्या सुरक्षेबाबत विविध सूचना केल्या.
एटीएम केंद्रांच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी बँकांना जानेवारी २०१४ अखेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे एटीएमच्या दरवाज्यावरील बँकेच्या जाहिरातीचा आकार कमी करावा, एटीएम केंद्राबाहेर २४ तास सुरक्षा असावी, एटीएम केंद्र निर्जन स्थळी असू नये, तिथे अर्लाम प्रणाली असावी, अशा अनेक सूचना बँकांना देण्यात आल्या आहेत. राज्यातील १० हजार एटीएम केंद्रांची माहिती गोळा केली जाईल, असेही पाटील यांनी सांगितले. या बैठकीला पोलीस महासंचालक संजीव दयाल, मुंबईचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग, रिझर्व बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक आर. केशवन्, इंडियन बँक असोसिएशनचे मुख्य सल्लागार ए. एम. पेडगांवकर आदी उपस्थित होते.