मुंबई : आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणात पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही चित्रीकरण सर्वत्र प्रसारित झाल्याची घटना ताजी असतानाच आता राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरणाबाबत काळजी घेण्याचे आदेश दिले आहेत. सीसीटीव्ही चित्रीकरण संबंधीत गुन्ह्यांमध्ये महत्त्वाचा पुरावा ठरू शकते. ते सर्वत्र प्रसारित झाल्यामुळे पुढे त्याचा खटल्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो, त्या अनुषंगाने हे आदेश देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

राज्यभरातील पोलिस ठाण्यांना एक परिपत्रक पाठवून पोलिस ठाण्यात सीसीटीव्ही चित्रीकरणाबाबत साधधगिरी बाळगण्याचे सांगण्यात आले आहे. अनेक प्रकरणांमध्ये सीसीटीव्ही महत्त्वपूर्ण पुरावा असतो. ते बाहेर आल्यास अथवा वायरल झाल्यास त्याचा परिणाम याप्रकरणांच्या खटल्यांवर होऊ शकतो. तसेच अशा चित्रीकरण पाहिल्यानंतर नागरिकांमध्ये पोलिसांबाबत चुकीचा दृष्टीकोन निर्माण होऊ शकतो, त्या अनुषंगाने आदेश देण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा >>>रुग्णाच्या मृत्युला जबाबदार ठरलेल्या ज्येष्ठ नागरिक डॉक्टरची शिक्षा कायम; मात्र वयामुळे शिक्षा भोगण्याचे आदेश देण्यास उच्च न्यायालयाचा नकार

भाजप आमदार गायकवाड २ फेब्रुवारीला त्यांच्या समर्थकांसह हिल लाईन पोलीस ठाण्यात जमिनीच्या वादावर चर्चा करण्यासाठी गेले होते. त्याच जागेसंदर्भात शिंदे सेना पक्षाचे कार्यकर्ता महेश गायकवाड आणि इतर समर्थकही तेथे पोहोचले. दोन्ही गटांमध्ये वाद सुरू झाला. त्यानंतर गायकवाड यांनी परवाना असलेले रिव्हॉल्व्हर काढून वरिष्ठ निरीक्षकांच्या केबिनमधील महेश गायकवाड यांच्यासह दोघांवर गोळीबार केला. वरिष्ठ निरीक्षकांच्या केबिनमध्ये घडलेल्या या घटनेचे चित्रीकरण समाज माध्यमांवर प्रसारित झाले होते.