तांत्रिक बिघाडामुळे नव्हे, तर केवळ शंभर रुपयांपर्यंतचे रबरी भोंगे नसल्याच्या क्षुल्लक कारणामुळे गेले काही दिवस ‘बेस्ट’च्या सुमारे १५० गाडय़ा आगारातच उभ्या असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.
बेस्टच्या प्रत्येक आगारातील किमान पाच ते आठ बस या भोंग्यांअभावी आगारांबाहेरच पडल्या नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे प्रवासी वाहतुकीबाबतही अनेक समस्या उद्भवल्या आहेत. मात्र भोंग्यांच्या कमतरतेमुळे गाडय़ा आगारातच उभ्या राहणे, ही दुर्दैवाची बाब असून त्यात तथ्य आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल; असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दोन वर्षांपूर्वी साडेचार हजारांच्या आसपास असलेला ‘बेस्ट’ बसगाडय़ांचा ताफा आता केवळ ३६०० एवढाच उरला आहे. त्यातील काही बसगाडय़ा आगारांतच उभ्या राहिल्या, तर वैतागून प्रवाशांना शेअर रिक्षा वा शेअर टॅक्सीकडे वळावे लागते. या पाश्र्वभूमीवर बेस्टच्या ताफ्यातील तब्बल १३० ते १५० गाडय़ा केवळ रबरी भोंगे उपलब्ध नसल्याने आगारातच उभ्या असल्याची धक्कादायक माहिती बेस्ट समितीचे सदस्य रंजन चौधरी यांनी समितीच्या बैठकीत मांडली. बेस्टच्या २७ आगारांत प्रत्येकी पाच ते सात गाडय़ा केवळ या एका कारणामुळे रस्त्यावरच उतरवल्या जात नाहीत. या भोंग्यांची किंमत ५० ते १०० रुपये एवढी कमी असूनही ते विकत घेतले जात नाहीत. त्याबाबत प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणीही चौधरी यांनी केली.

रबरी भोंग्यांच्या कमतरतेमुळे गाडय़ा आगारातच उभ्या करण्याची बाब अत्यंत चमत्कारिक आहे. भोंगे नसले, तरी गाडय़ा रस्त्यांवर धावू शकतात. त्यामुळे या प्रकरणाबाबत चौकशी करण्यात येणार आहे. तसेच त्यात तथ्य आढळल्यास अशा क्षुल्लक कारणांसाठी गाडय़ा रस्त्यांवर न उतरवल्याबद्दल संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल.
– डॉ. जगदीश पाटील, महाव्यवस्थापक, बेस्ट