जवळचा ‘बेस्ट’ बस प्रवास अद्याप महागच
लांब पल्ल्याच्या प्रवासाकरिता बेस्टने १ जुलैपासून प्रवाशांना दिलासा दिला असला तरी दोन, चार आणि सहा असा जवळच्या पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बेस्टने ठेंगाच दाखविला आहे. महत्त्वाचे म्हणजे बेस्टला जवळच्या पल्ल्याच्या प्रवासातूनच सवाधिक नफा मिळतो. दर महिन्याला तब्बल साडेपाच कोटींहून अधिक प्रवासी तिकिटे या टप्प्यात फाडली जातात; परंतु ते या बेस्टच्या स्वस्त प्रवासाला मुकले आहेत.
बेस्टने नवीन भाडे टप्प्यात सुसूत्रीकरण करत ८, १२, १७, २५, ३५, ४५ अशा लांब पल्ल्यांचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा दिला. यामुळे बेस्टच्या उत्पन्नात काही अंशी वाढ झाली असली तरी सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या २, ४ आणि ६ किलोमीटरमधील बेस्टसाठी लाभदायी असणाऱ्या प्रवाशांना कोणताही दिलासा मिळालेला नाही.
भाडे टप्प्यात सुसूत्रीकरण आणि पासात सवलत देण्याच्या निर्णयाने लाखो प्रवाशांना दिलासा मिळत असला तरी परिवहन उपक्रमावर लाखो रुपयांचा भरुदड पडणार असल्याचे अधिकारी कळकळीने सांगत आहेत. हा तोटा भरून काढण्यासाठी बेस्ट दररोज ५५५ अतिरिक्त पासांच्या विक्रीवर अवलंबून आहे. मात्र प्रवाशांसाठी भरुदड उचलण्यासाठी तयार झालेल्या बेस्टने आपल्या सर्वाधिक संख्या असलेल्या २, ४ आणि ६ किलोमीटरच्या मार्गावरील प्रवाशांकडे दुर्लक्ष केले आहे, असा आरोप बेस्ट समितीच्या सदस्यांनी केला.
सध्या बेस्टचे दरमहा २ किलोमीटरसाठी सरासरी १ कोटी २२ लाख प्रवासी, ४ किलोमीटरसाठी २ कोटी ८३ लाख ५० हजार प्रवासी, ६ किलोमीटरसाठी १ कोटी १६ लाख प्रवासी प्रवास करतात. ही प्रवासी संख्या सुमारे साडेपाच कोटींच्या घरात आहे. तर १० किलोमीटरसाठी दरमहा सरासरी ७७ लाख, १४ किलोमीटरसाठी २७ लाख, २० किलोमीटरसाठी ११ लाख आणि ३० किलोमीटरसाठी ८ लाख प्रवासी प्रवास करतात. यात आता ८, १२, १७, २५, ३५ आणि ४५ असे नवीन टप्पे सुरू करण्यात आले आहे. मात्र पहिल्या सहा किलोमीटरच्या आत प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक असताना नंतरचे टप्पे वाढवून बेस्टला फार उत्पन्न मिळेल, असे नाही. त्यामुळे प्रशासनाने बेस्टच्या २, ४ आणि ६ किलोमीटरच्या प्रवाशांसाठी भाडेकपात करावी अशी मागणी बेस्ट समितीचे सदस्य रवी राजा यांनी केली.