सर्वच कर्मचाऱ्यांसाठी १ मार्चपासून नवी डय़ुटी पद्धती लागू करण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाविरोधात बेस्टच्या मुंबईतील २५ आगारांतील वाहक व चालक यांनी नाराजी नोंदवली आहे. या  पद्धतीमुळे कर्मचाऱ्यांचे कामाचे तास ८ वरून १२ वर पोहोचले आहेत. त्याचा निषेध म्हणून या कर्मचाऱ्यांनी डय़ुटीचा तक्ता भरण्यावर बहिष्कार टाकला असून यामुळे १ मार्चपासून बेस्ट बसेसच्या प्रवर्तनांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने मात्र या पद्धतीविरोधात कर्मचाऱ्यांत कोणताच असंतोष नसल्याचे सांगितले.
प्रत्येक वाहक व चालकांना आठ तासांच्या कामगिरीबरोबरच काही वेळ विश्रांती दिली जात असे. त्यामुळे त्यांची कामाची वेळ साडेआठ तासच भरत होती. मात्र  नव्या पद्धतीनुसार कर्मचाऱ्यांची कामाची वेळ १२ तास होईल. त्यात कामाची विभागणी करून चालक-वाहक यांना चार तासांचा कालावधी विश्रांतीसाठी देण्यात येणार आहे. मात्र हा बदल कर्मचाऱ्यांना मान्य नाही. म्हणून कर्मचाऱ्यांनी डय़ुटीचा तक्ता भरण्यावर बहिष्कार टाकण्याचे अस्त्र उगारले आहे.
प्रत्येक चालक व वाहक यांची डय़ुटी चार महिन्यांनंतर बदलण्यात येते. या डय़ुटीचा तक्ता प्रत्येक आगारात  असतो. तो प्रत्येक कर्मचाऱ्याला भरावा लागतो. त्यानुसार त्या वाहक-चालकांच्या ठिकाणाचे स्वरूप स्पष्ट होऊ शकते. मात्र हा तक्ता भरला न गेल्यास कोणता कर्मचारी कोठे आहे, हे समजणे कठीण असते. त्याचा परिणाम वाहतुकीवर होऊ शकतो. १ मार्चपासून नेमकी हीच परिस्थिती मुंबईच्या रस्त्यांवर उद्भवण्याची शक्यता आहे.