सामाजिक वातावरण तापविण्याचे प्रयत्न

भीमा कोरेगावच्या माध्यमातून मराठा विरुद्ध दलित अशी सामाजिक दरी वाढविण्याचे पद्धतशीरपणे प्रयत्न झाले असून, मराठा मोर्चानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा लक्ष्य करण्यात आले आहे. हिंसाचारानंतर हिंदुत्ववादी नेत्यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाल्याने भाजपची अधिक कोंडी होणार आहे.

भीमा कोरेगावच्या २००व्या स्मृतीदिनानिमित्त कार्यक्रमाच्या आयोजनावरूनच वाद निर्माण झाला होता. काही संघटनांनी या कार्यक्रमाला विरोधही केला होता. तेव्हाच सरकारी यंत्रणेने खबरदारी घेणे आवश्यक होते. पण कालच्या घटनेनंतर पोलीस यंत्रणा कमी पडल्याचे वास्तव समोर आले. भीमा कोरेगाव प्रकरणाच्या माध्यमातून मराठा समाज विरुद्ध दलित समाजातील दरी वाढविण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न झाला आहे. ग्रामीण भागांमध्ये अजूनही काही गावांमध्ये या दोन समाजात तेवढा एकोपा नसतो. भीमा कोरेगावच्या स्मृतीदिनाच्या कार्यक्रमानंतर उसळलेल्या हिंसाचारानंतर दोन समाजातील तेढ वाढली आहे.

मराठा मोर्चाच्या माध्यमातून मुख्यमंत्री फडणवीस यांना पद्धतशीरपणे लक्ष्य करण्यात आले होते. शेजारील गुजरातमध्ये पटेल समाजाच्या आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणानंतर तेथील सामाजिक परिस्थिती बदलली. शेवटी सत्ताधारी भाजपला मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांना बदलावे लागले होते. पटेल समाजाच्या नाराजीचा भाजपला गुजरात निवडणुकीत फटका बसला. मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावरून मुख्यमंत्री फडणवीस यांची कोंडी करण्याचा पद्धतशीर प्रयत्न झाला. अर्थात, मराठा समाजाच्या या आक्रमक भूमिकेमुळे इतर मागासवर्गीय आणि दलित समाजाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला साथ दिली होती. मराठा आरक्षणाला होणाऱ्या विलंबास फडणवीस हे जबाबदार असल्याचे खापर फोडले जाते. आता दलित समाजात भाजपबद्दल प्रतिकूल मत तयार करण्याचा प्रयत्न  सुरू झाला आहे. हिंदुत्ववादी नेत्यांनी पूर्वनियोजितपणे हा हिंसाचार घडवून आणल्याचा आरोप विरोधी नेत्यांनी केला आहे. तसा प्रचार होणे भाजपसाठी त्रासदायक ठरू शकते. त्यातच प्रकाश आंबेडकर यांनी हिंसाचारास जबाबदार धरलेल्या भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे या हिंदुत्ववादी नेत्यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाल्याने भाजपची अधिकच पंचाईत झाली.

पटेल समाजाच्या नाराजीचा भाजपला गुजरातमध्ये फटका बसला. यामुळेच महाराष्ट्रात मराठा समाजाच्या नाराजीचा किती परिणाम होऊ शकतो याचा अंदाज भाजपकडून घेण्यात येत आहे.

दलित आणि मराठा समाजात भांडणे लावून त्याचा राजकीय फायदा उठविण्याचा काही प्रवृत्तींचा डाव आहे. फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारधारेला मानणाऱ्या सर्वानी एकत्र येऊन हा कुटिल डाव हाणून पाडावा.

अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस