आकर्षक सवलतींमुळे विक्रीत ४० टक्क्यांपर्यंत वाढ
‘वस्तू व सेवा करा’च्या (जीएसटी) अंमलबजावणीपूर्वी केलेल्या खरेदीवर आकर्षक सवलती जाहीर झाल्याने हंगाम नसतानाही सध्या बाजारात तेजीचे वातावरण आहे. मोठय़ा विक्रेत्यांकडून ‘जीएसटी’पूर्व खरेदीवर पाच ते ७० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जात असल्याने ग्राहकांची बाजारात गर्दी होत आहे. जीएसटी लागू झाल्यानंतर वस्तू महाग होण्याची भीती ग्राहकांनाही वाटू लागल्याने बाजारात सध्या खरेदी-विक्रीला जोर आला आहे. गेल्या आठ दिवसांत विक्रीच्या उलाढालीत ४० टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.
वस्तू व सेवा कर लागू झाल्यावर नेमक्या कोणत्या वस्तूंच्या किमती वाढणार आहेत व कोणत्या वस्तूंच्या कमी होणार आहेत, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत. यातच इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किमतीत किमान पाच व कमाल २५ टक्क्यांपर्यंत वाढ होणार असल्याची चर्चा आहे. याचाच फायदा घेत विजय सेल्स, स्नेहांजली, क्रोमा, कोहिनूरसारख्या बडय़ा विक्रेत्या ब्रॅण्डसनी ‘जीएसटी सेल’चे आयोजन करत सवलतींचा पाऊस पाडला आहे. १ जुलैपूर्वी वस्तूंची खरेदी केल्यास त्या जुन्या किमतीत व त्याही सवलतीच्या दरात मिळतील अशा जाहिराती करून ग्राहकांना आकर्षित केले जात आहे. ग्राहकांनीही या संधीचा फायदा घेत दुकानांमध्ये खरेदीसाठी गर्दी केली आहे. त्यामुळे या कालावधीत विक्रीत सुमारे ४० टक्क्यांनी वाढ झाल्याचे विजय सेल्सचे विजय गुप्ता यांनी सांगितले.
वस्तू व सेवा कराच्या अंमलबजावणीबाबत विक्रेत्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर संभ्रम आहे. यामुळे बाजारात घबराहट पसरली आहे. यामुळे अनेक विक्रेत्यांनी जुलै महिन्यातील त्यांचा वार्षिक सेल यावेळेस एक महिना आधी सुरू केल्याचे रिटेल असोशिएशन ऑफ इंडियाचे कुमार राजगोपालन यांनी सांगितले. विक्रेत्यांनी त्यांच्याकडे सध्या असलेला वस्तूंचा साठी पुढील सहा महिन्यात संपवला नाही तर त्यांना करपरताव्यात नुकसान सहन करावे लागेल. यामुळे हे नुकसान सहन करण्यापेक्षा विक्रेते सवलतीत विक्री करणे पसंत करत असल्याचेही राजगोपालन यांनी स्पष्ट केले. ग्राहकांना मोठय़ा प्रमाणावर सवलत मिळत असल्यामुळे ते खरेदीसाठी आकर्षित होत आहेत. यामुळे या सेलला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही ते म्हणाले. नवीन करप्रणाली लागू झाल्यानंतर ती स्थीरावण्यास किमान दोन ते तीन महिन्यांचा कालावधी जाईल. या कालावधीत विक्रेत्यांचा संभ्रम कमी करण्यासाठी आम्ही मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयोजन करत असल्याचे व्हिडीओकॉनचे सीओओ सी. एम. सिंग यांनी सांगितले.