मुंबई : राज्यात जन्मदरात २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये सुमारे दोन टक्क्यांनी, तर देशभरात २.४ टक्क्यांनी घट झाल्याचे नागरी नोंदणी अहवाल २०२० मधून निदर्शनास आले आहे.  २०१९ मध्ये राज्यभरात १७ लाख ४७ हजार १४५ बालकांचा जन्म झाला होता. २०२० मध्ये यात सुमारे ३५ हजारांची घट होऊन १७ लाख १२ हजार ३ बालकांचा जन्म झाला आहे. २०१३ पासून राज्यात जन्माला येणाऱ्या बालकांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. परंतु २०१९ मध्ये काही अंशी यात वाढ झाल्याचे नोंदले आहे. २०२० मध्ये मात्र पुन्हा घट झाली आहे. राज्यात बालकांच्या जन्माचे प्रमाण ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरांमध्ये जास्त आहे. राज्यात सर्वाधिक सुमारे १ लाख ३६ हजार बालके पुण्यात जन्माला आली असून याखालोखाल नाशिक, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांचा समावेश आहे.  ग्रामीण भागात सर्वाधिक सुमारे २६ हजार बालकांचा जन्म नाशिकमध्ये झाला असून यानंतर नंदुरबारचा क्रमांक लागतो. येथे १४ हजार बालके २०२० मध्ये जन्माला आली आहेत. या खालोखाल पुणे, नगर, औरंगाबाद आणि सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे.

शहरात सर्वाधिक बालके मुंबईत

शहरांमध्ये सर्वाधिक सुमारे १ लाख २० हजार बालके मुंबईत जन्माला आली असून त्याखालोखाल पुणे, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यांचा समावेश आहे.  देशभरात पुन्हा घट देशभरात २०१५ ते २०१७  या काळात जन्मलेल्या बालकांच्या संख्येत घट झाल्याचे आढळले. परंतु २०१८ पासून यात पुन्हा वाढ झाली. २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये जन्मलेल्या बालकांच्या संख्येत सुमारे सहा टक्क्यांनी वाढ झाली. परंतु २०२० मध्ये पुन्हा घट होत हे प्रमाण कमी झाले आहे. २०२० मध्ये देशभरात बहुतांश राज्यांमध्ये जन्मलेल्या बालकांच्या संख्येत घट झाली असून सर्वाधिक सुमारे ४० टक्के घट नागालॅँडमध्ये झाली आहे. याखालोखाल चंदीगढ, मणिपूर, तेलंगणा, अरुणाचल प्रदेश या राज्यांचा समावेश आहे.

‘एनएफएचएस ५’ मध्येही प्रजनन दरामध्ये घट

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या (एनएफएचएस ५) अहवालानुसारही राज्यासह देशभरात प्रजनन दरामध्ये घट होत असल्याचे नोंदले आहे. या अहवालानुसार राज्याचा प्रजनन दर २०१५-१६  या कालावधीत केलेल्या एनएफएचएस ४ मध्ये १.९ टक्के होता २०१९ ते २०२० या काळात केलेल्या पाचव्या सर्वेक्षणामध्ये यात घट होऊन १.७ टक्के झाला आहे.

या राज्यांमध्ये वाढ कायम..

 देशभरात हरियाणामध्ये मात्र बालकांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणात म्हणजेच सुमारे आठ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याखालोखाल बिहार, सिक्कीम, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांमध्येही वाढ झाल्याचे आढळले आहे.