मुंबई : पालिका रुग्णालयांतील रुग्णांचे कपडे धुण्यासाठी अत्याधुनिक अशी टनेल लॉन्ड्री उभारण्यासाठी सुरू केलेल्या निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपने केला आहे. कपडे धुण्याच्या या अत्याधुनिक यंत्रणेत पालिकेच्या अधिकाऱ्यांनी हात धुऊन घेतल्याचा आरोप करीत एका अधिकाऱ्याने १६ कोटींची रक्कम स्वीकारली असल्याचा दावा भाजपच्या एका आमदारांने केला आहे. त्यामुळे ही निविदा प्रक्रिया वादात सापडली आहे.
पालिका रुग्णालयातील रुग्णांचे कपडे धुण्यासाठी आतापर्यंत पालिकेच्या मध्यवर्ती धुलाई केंद्रात किंवा खासगी कंत्राटदारांकडे दिले जात होते. मात्र पालिकेने आता टनेल लॉन्ड्री या अत्याधुनिक प्रकल्पाची उभारणी करण्याचे ठरवले आहे. त्याकरिता पालिकेने निविदा मागवल्या आहेत. या प्रकल्पाची किंमत १६० कोटी असून या निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आ. अमित साटम यांनी केला आहे. या कंत्राटासाठी एका अधिकाऱ्याने १६ कोटींची रक्कम स्वीकारल्याचा आरोपही त्यांनी केला असून वेळ आल्यावर त्याचे नाव व पुरावे सादर करण्याचा इशाराही साटम यांनी प्रशासक आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पत्राद्वारे दिला आहे.
टनेल लॉन्ड्री उभारण्यासाठी कोणतेही तंत्रज्ञान किंवा अनुभवाबाबतच्या अटी निविदा प्रक्रियेत समाविष्ट करण्यात आलेल्या नाहीत. सगळय़ा गोष्टी विशिष्ट कंत्राटदाराला लाभ होईल अशा पद्धतीने करण्यात आल्या आहेत. निविदा प्रकिया राबवताना त्यात मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करण्यात आलेला नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.
ही अत्याधुनिक लॉन्ड्री पालिकेच्या शिवडी येथील क्षयरोग रुग्णालयाच्या आवारात उभारण्यात येणार आहे. त्यामुळे या कपडय़ांद्वारे जंतुसंसर्ग होऊन क्षयरोगाचा प्रसार होईल, अशीही भीती त्यांनी पत्रात व्यक्त केली आहे. या भीतीपोटी आरोग्य विभागाने या लॉन्ड्रीला परवानगी नाकारली असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी या पत्रात केला आहे. या टनेल लॉन्ड्री प्रकल्पाची निविदा प्रक्रिया रद्द करावी व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी साटम यांनी केली आहे.
पालिका प्रशासनाने आरोप फेटाळले
पालिका प्रशासनाने साटम यांचे आरोप फेटाळून लावले असून टनेल लॉन्ड्री प्रस्ताव तयार करताना या क्षेत्रातील अनुभवी उत्पादक कंपन्यांकडून योग्य तो तांत्रिक तपशील घेऊन ही निविदा तयार करण्यात आली असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ही निविदा तयार करण्यात आली असल्याचे पालिकेच्या यांत्रिकी व विद्युत विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यामध्ये सात वर्षे लॉन्ड्री चालवणे व सहा वर्षे परिरक्षण आदी खर्चही समाविष्ट असल्यामुळे याचा अंदाजित खर्च १६० कोटी असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. लॉन्ड्रीसाठी निश्चित करण्यात आलेली जागा रुग्णालयाच्या बाहेरील बाजूस असून ती रुग्णालयापासून विलग आहे. त्यामुळे जंतुसंसर्गाचा धोका निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.