मुंबई : राज्यात गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तानाटय़ाच्या अंतिम टप्प्यात भाजपने धक्कातंत्राचा अवलंब केला. मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे, तर उपमुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी गुरुवारी सायंकाळी राजभवनात पार पडला. शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देऊन शिवसेनेवर त्यांचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचा भाजपचा उद्देश स्पष्ट झाला असला तरी फडणवीस यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपद देण्यात आल्याने पक्षनेते बुचकळय़ात पडले. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार सत्तेत येईल, अशी अटकळ बांधली जात होती. पण, दिवसभरात राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या विविध नाटय़मय घडामोडी घडल्या.

 एकनाथ शिंदे हे दुपारी गोव्यातून मुंबईत परतले. शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. त्यावेळी फडणवीस हे मुख्यमंत्री होणार आणि रात्री शपथ घेणार, असेच चित्र होते. राज्यपालांच्या भेटीनंतर फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत मात्र एकनाथ शिंदे हे रात्री मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, असे जाहीर केल़े  त्यावेळी नाटय़मय घडामोडींचा पहिला अंक पाहायला मिळाला. आपण सरकारमध्ये सहभागी होणार नाही, पण सरकार योग्यपणे चालेल ही जबाबदारी माझी असेल, असे फडणवीस यांनी सांगितले.   राजभवनात शपथविधी सोहळय़ाची तयारी सुरू असतानाच नाटय़मय घडामोडींचा दुसरा अंक घडला. फडणवीस यांनी नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदी सहभागी व्हावे, असा पक्षाचा आदेश असल्याचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. फडणवीस हे नव्या सरकारमध्ये सहभागी होतील, असे ट्वीट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. त्यानंतर थोडय़ाच वेळात फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

शिवसेनेचे वर्चस्व कमी करणे हे भाजपचे उद्दिष्ट लपून राहिलेले नाही. यातूनच भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रिपद सोपविण्याचा धक्कादायक निर्णय घेतल्याचे मानले जाते. शिवसेनेवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी शिंदे गटाचा प्रयत्न असेल. उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेचे नेतृत्व राहू नये, हा प्रयत्न आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांनाही भाजपच्या नेतृत्वाने धक्का दिल्याचे मानले जाते.

बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा उल्लेख

राजभवनात झालेल्या छोटेखानी समारंभात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. शपथ घेताना मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा आवर्जुन उल्लेख केला. उपमुख्यमंत्रिपद नाईलाजाने स्वीकारावे लागत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांच्या देहबोलीवरून स्पष्टपणे जाणवत होते. शपथविधीनंतर माध्यमांशी काहीही न बोलता फडणवीस निघून गेले. भाजपमध्ये राष्ट्र आणि पक्ष सर्वात मोठा असतो. पक्षनेतृत्व निर्णय घेईल, त्यानुसार जबाबदारी घ्यावी लागते, असे कारण सांगत भाजपच्या नेत्यांना फडणवीस यांच्या उपमुख्यमंत्रीपदाबाबत माध्यमांसमोर सारवासारव करावी लागली.

शिवसेना नेते अनुपस्थित

नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी समारंभाला मावळते मुख्यमंत्री उपस्थित राहतात. परंतु, शिवसेनेतील बंडामुळे मुख्यमंत्रीपद गमवावे लागल्याची उद्विग्नता उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली होती़ शिंदे यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाल्याने शिवसेनेच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखेच होते. यामुळेच मावळते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा मावळत्या मंत्रिमंडळातील कोणीही यावेळी उपस्थित नव्हते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेतेही फिरकले नाहीत. भाजपचे नेते आणि कार्यकर्ते मोठय़ा प्रमाणावर उपस्थित होते, पण त्यांच्यात उत्साह अजिबात दिसत नव्हता.

पक्षनेतृत्वाचा आदेश अन् सत्तानाटय़ाला कलाटणी

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मी सहभागी होणार नाही, पण सरकार चालविण्याची जबाबदारी माझी असेल, असे सांगत या सरकारचे ‘रिमोट कंट्रोल’ आपल्याकडे असेल, असे सूचित करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना केवळ दोन तासांतच धक्का बसला़  सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सहभागी होण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दिल्याने पक्षनेतृत्वाने फडणवीस यांचे पद्धतशीरपणे खच्चीकरण केल्याचे चित्र समोर आले आहे.

  एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे उद्धव ठाकरे यांचे सरकार कोसळल्यानंतर फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार, हे साऱ्यांनीच गृहित धरले होते. भाजप नेत्यांची तशीच अपेक्षा होती. पण, दिल्ली दौऱ्यानंतर फडणवीस यांची देहबोली बदलली होती, असे निरीक्षण भाजपच्या काही नेत्यांनी नोंदविले होते. गुरुवारी सकाळीही फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापण्याचा दावा केला़  त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी शिंदे हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, असे सांगून सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला. तसेच या सरकारमध्ये सहभागी होणार नाही. पण, सरकार योग्यपणे चालेल ही जबाबदारी आपली असेल, असे फडणवीस यांनी जाहीर केले.

  शिंदे हे मुख्यमंत्री असतील, हे फडणवीस यांनी जाहीर केले तेव्हाच भाजपच्या नेतृत्वाने फडणवीस यांना धक्का दिल्याचे मानले जात होते. मुख्यमंत्रिपदी फडणवीस नाहीत आणि शिंदे मुख्यमंत्री होणार, यातून भाजपमध्ये अस्वस्थता पसरली होती. राजभवनात शिंदे यांच्या शपथविधीची तयारी सुरू झाली होती. मंचावर दोनच खुच्र्या ठेवण्यात आल्या होत्या. सारे काही सुरळीत होईल, असे चिन्ह असतानाच भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी बॉम्बगोळाच टाकला. फडणवीस यांनी नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सहभागी व्हावे, असे निर्देश देण्यात आल्याचे नड्डा यांनी माध्यमांना सांगितले. थोडय़ाच वेळात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्वीट केले. देवेंद्र फडणवीस यांनी मोठे मन दाखवत महाराष्ट्र सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याचे त्यात म्हटले होते. मुख्यमंत्रीपद भूषवल्यानंतर नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सहभागी होणे, हे फडणवीस यांच्यासाठी अपमानास्पदच होते. यातूनच बहुधा नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सहभागी होण्यास फडणवीस हे राजी नव्हते. अखेर फडणवीस यांना पक्ष आदेश देत आहे, असे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांना जाहीर करावे लागले. लगेचच अमित शहा यांनी फडणवीस सरकारमध्ये सहभागी होतील, असे जाहीर केले. त्यानंतर राजभवनात शपथविधीसाठी मंचावर एक खुर्ची वाढविण्यात आली.

अमित शहा आणि नड्डा यांच्या आदेशामुळेच फडणवीस यांना उपमुख्यमंत्रिपद स्वीकारावे लागले. पक्षादेश मानून फडणवीस यांनी शपथ घेतली. पण, पाच वर्षे राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषविलेल्या फडणवीस यांना एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणे हे नक्कीच भूषणावह नाही. फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात.

दिल्लीत नरेंद्र, तर मुंबईत देवेंद्र अशा घोषणा सुरू झाल्या होत्या. भावी पंतप्रधान म्हणून फडणवीस यांचा उल्लेख करण्यात येऊ लागला. दिल्लीतील भाजपच्या काही नेत्यांना ही बाब खटकू लागली. त्यातूनच फडणवीस यांचे पंख कापण्याचे पद्धतशीरपणे प्रयत्न सुरू झाले. २०१९ मध्ये राज्यात शिवसेनेबरोबर सरकार स्थापन झाले नाही याबद्दल फडणवीस यांना दोष दिला जात होता. आता तर उपमुख्यमंत्रिपद सोपवून त्यांना धक्का देण्यात आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा़  शिंदे यांना मुख्यमंत्री करणे हे जेवढे धक्कादायक, त्यापेक्षा फडणवीस यांना उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास भाग पाडले, हे अधिक धक्कादायक आहे. पण, भाजपमध्ये वरिष्ठांच्या आणि नागपूरच्या आदेशाबाबत तडजोड करता येत नाही, हे फडणवीस यांनी दाखवून दिले.

-शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भावी वाटचालीस शुभेच्छा. आपल्या हातून महाराष्ट्रामध्ये चांगले काम होवो, ही सदिच्छा!

– उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री