मुंबई: एस. टी. कर्मचाऱ्यांच्या संपात आतापर्यंत महत्त्वाची भूमिका बजाविलेल्या भाजप नेत्यांचे संपकऱ्यांवर नियंत्रण राहिले नसल्याचे बुधवारी समोर आले.

गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी संपकरी एस टी कर्मचाऱ्यांचे आतापर्यंत नेतृत्व केले. सरकारबरोबर वाटाघाटींमध्ये हेच दोघे सहभागी होत होते. बुधवारी तिढा संपेल असे चित्र असताना संपकरी कर्मचाऱ्यांनी पडळकर आणि खोत यांनाच लक्ष्य केले. परिवहनमंत्री अनिल परब यांच्याबरोबर बैठकीतून परतल्यावर आझाद मैदानात सकाळी उभयतांना कर्मचाऱ्यांनी जाब विचारला.

सायंकाळी परब यांच्या बरोबर पत्रकार परिषदेला पडळकर व खोत दोघेही उपस्थित होते. परब यांचा वेतन वाढीचा प्रस्ताव कर्मचाऱ्यांना मान्य झाला नाही. त्यानंतर आझाद मैदानात परतलेले खोत  व पडळकर  अस्वस्थ दिसत होते. एरव्ही लांबलचक भाषणे करणाऱ्या या दोघांनी दोन दोन मिनिटात आवरते घेतले. कर्मचाऱ्यांच्या रोषामुळे खोत व पडळकर यांना भूमिकाही मांडता आली नाही.

ग्रामीण भागात नाराजी

संपामुळे ग्रामीण भागात नाराजी व्यक्त केली जात आहे. भाजप नेत्यांमुळे संप लांबला अशी टीका सुरू झाली. परिणामी संप अधिक लांबणे भाजपलाही सोयीचे नाही.