मुंबई महापालिकेच्या अधिका-यांनी लाच मागितल्याचा आरोप करणा-या कपिल शर्माच्या घराबाहेर सोमवारी भाजप आमदार राम कदम यांनी आंदोलन केले. भ्रष्टाचाराविरोधात आम्ही कपिल शर्मासोबत आहोत, कपिलने आरोप केलेत, आता पैसे मागणा-या अधिका-यांची नावही जाहीर करावीत अशी मागणी करत राम कदम यांनी कपिलच्या घराबाहेर आंदोलन केले आहे.

काही दिवसांपूर्वी विनोदी अभिनेता कपिल शर्माने मुंबई महापालिकेच्या अधिका-यांनी लाच मागितल्याचे ट्विट केले होते. यानंतर कपिलने थेट नरेंद्र मोदींना टॅग करत हेच का तुमचे अच्छे दिन असा सवाल ट्विटरव्दारे उपस्थित केला होता. कपिलने माहिती द्यावी आम्ही कारवाई करु असा पवित्रा बीएमसीने घेतला होता. मात्र कपिलने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे शेवटी भाजप आमदार राम कदम यांनी कपिल शर्माच्या घराबाहेर धडक दिली. राम कदम कपिल शर्माला भेटण्यासाठी त्याच्या घरी जाणार होते. पण पोलिसांनी त्यांना जाण्यापासून रोखले. शेवटी कपिलच्या घराबाहेरच राम कदम यांनी आंदोलन केले.

कपिल शर्माने भ्रष्ट अधिका-यांची नावं जाहीर करावीत. आम्ही कपिलसोबत आहे. पण त्याने या भ्रष्ट अधिका-यांना पाठिशी घालू नये असे राम कदम यांनी सांगितले. कपिलने केलेले आरोप विनोद नाहीत. त्याने केलेले आरोप हे गंभीर स्वरुपाचे आहेत असा चिमटाही त्यांनी कपिल शर्माला काढला आहे. कपिल शर्मा या अधिका-यांची नाव का जाहीर करत नाही. त्याच्यावर कोणाचा दबाव आहे का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. राम कदम यांनी कपिल शर्माविरोधात ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे.  आम्ही पोलीस अधिका-यांशी चर्चा केली. त्यांनी कपिल शर्माला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले जाईल असे आश्वासन दिल्याचे राम कदम यांनी सांगितले.

कपिलच्या भ्रष्टाचाराच्या ट्विटवरुन सध्या राजकारण सुरु झाले आहे. शिवसेना आणि मनसेने कपिल शर्माने पुरावे द्यावे अन्यथा त्याचा शो बंद पाडू असा इशारा दिला होता. तर मुख्यमंत्र्यांनीही कपिल शर्माच्या ट्विटची दखल घेत चौकशीचे आदेश दिले होते. तर दुसरीकडे कपिल शर्माकडे ज्या कार्यालयासाठी लाच मागण्यात आली होती. ते कार्यालयच अनधिकृत असल्याचा आरोप स्थानिकांनी केल्यावर कपिल शर्माच्या अडचणीत भर पडली होती. आपल्या टिवटिवमुळे राजकारण सुरु झाल्याचे लक्षात येताच कपिल शर्माने माझा कोणत्याही पक्षावर आरोप नाही. मी फक्त भ्रष्टाचाराचा मुद्दा मांडला होता अशी सारवासारव केली होती.