scorecardresearch

उद्धव ठाकरे आमच्याबरोबर असते तर, आमदार फुटले नसते ; आशीष शेलार यांचे प्रतिपादन

मित्रपक्षाला संपविणे, ही भाजपची रणनीती असल्याचे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे,

उद्धव ठाकरे आमच्याबरोबर असते तर, आमदार फुटले नसते ; आशीष शेलार यांचे प्रतिपादन
(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : शिवसेना आपापसातील द्वंद्वामुळे फुटली असून उद्धव ठाकरे यांची शिवसेना आमच्याबरोबर राहिली असती, तर हे द्वंद्व झालेच नसते आणि आमदार फुटले नसते, असे प्रतिपादन भाजप आमदार अ‍ॅड. आशीष शेलार यांनी बुधवारी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नेतृत्वावर टीका करून काँग्रेस फोडून आपला पक्ष स्थापन केला. त्यांना मित्रपक्षाला संपविण्याची भाजपची रणनीती, हे बोलण्याचा नैतिक अधिकारच नसल्याचे शेलार यांनी स्पष्ट केले. आपल्या पक्षातील नेते तुरुंगात असताना विरोधक आमच्या युतीवर टीका करीत आहेत, असे सांगून शेलार म्हणाले, ही वैचारिक लढाई आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदूत्ववादी विचार वाढविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ही भूमिका घ्यावी लागली. उद्धव ठाकरे जेव्हा आमच्याबरोबर होते, त्या वेळी ते एका विचारधारेबरोबर, हिंदूत्वाबरोबर आणि राष्ट्रहिताबरोबर होते. द्वंद्व निर्माण होण्याची स्थिती उद्धव ठाकरे यांनी आणली आहे. मित्रपक्षाला संपविणे, ही भाजपची रणनीती असल्याचे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे, त्याबाबत शेलार म्हणाले, पवार हे मोठे नेते आहेत. त्यांना फार जुन्या गोष्टीची आठवण करून देण्याची आवश्यकता नाही. त्यांनी काँग्रेस नेतृत्वावर टीका करून तो संपविण्याचा प्रयत्न केला, आपला पक्ष स्थापन केला. भाजपने कसे वागावे, यासाठी त्यांनी मार्गदर्शन करण्याची गरज आहे का? शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाला मिळावा, याबाबत त्यांना मत मांडण्याचा अधिकार असला तरी ते म्हणजे निवडणूक आयोग नाही. कायदा आपले काम करील.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.