आगामी निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर अल्पसंख्याकांना खूष करण्यासाठी मुंबई भाजपने बुधवारी सायंकाळी इफ्तार पार्टीचे आयोजन हज हाऊसमध्ये केले आहे. खासदार शाहनवाज हुसेन यांच्यासह ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते विनोद तावडे आदी यावेळी उपस्थित राहणार आहेत.
हिंदुत्वाच्या वाटेने निघालेल्या भाजपकडून अल्पसंख्याक समाजालाही आपल्या बाजूने वळविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी इफ्तार पार्टी आयोजित केली आहे.
 हे अल्पसंख्याकांचे लांगूलचालन नसून दरवर्षी अल्पसंख्याक विभागाकडून इफ्तार पार्टी आयोजित केली जाते, असे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी सांगितले. तर अशी पार्टी नागपूरमध्येही होते, असे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.