‘लोकसत्ता’च्या व्यासपीठावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे परखड मत

Mahayutis Srirang Barne Show of Power An 80-year-old lady Shiv Sainik also participated in rally
महायुतीच्या श्रीरंग बारणेंचं शक्ती प्रदर्शन; ८० वर्षाच्या कट्टर शिवसैनिक आजीही रॅलीत सहभागी
Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray
“उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिले काम काय केले? तर…”; चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
central government, appoints manoj panda
वित्त आयोगाच्या सदस्यपदी अर्थतज्ज्ञ मनोज पांडा, डॉ. निरंजन राजाध्यक्ष यांच्या जागी निवड
Sudhir Mungantiwar-Kishore Jorgewar reunion Will campaign in the Lok Sabha elections
सुधीर मुनगंटीवार-किशोर जोरगेवार यांचे मनोमिलन; लोकसभा निवडणुकीत प्रचार करणार

मुंबई : केंद्रात सत्ता आहे म्हणजे राज्यांची मुस्कटदाबी करत त्यांना बदनाम करायचे, हे सत्तापिपासूपणाचे आणि पातळी सोडलेले राजकारण असून ते देश आणि लोकशाहीला हानिकारक आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात गांजाची शेतीच होते आणि तो देशातील सर्वात सडका भाग आहे, अशा पद्धतीने राजकारण केले जात असून हे महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे. पण दिवस बदलत असतात हे लक्षात ठेवावे , असा इशारा देत भाजपविरोधासाठी नव्हे तर देश आणि राज्याच्या हितासाठी देशातील इतर पक्षांसह राष्ट्रीय पातळीवर आघाडी करण्याची शिवसेनेची तयारी असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘लोकसत्ता’च्या वर्धापनदिन कार्यक्रमात बोलताना स्पष्ट केले.

‘लोकसत्ता’च्या वर्धापन दिन कार्यक्रमात वर्षवेध या वार्षिक अंकाचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यानिमित्त झालेल्या मुलाखतीत सध्याच्या राजकीय घडामोडींवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी मोकळेपणाने भाष्य केले. ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला.

गेल्या काही दशकांचा अनुभव पाहता देशात आघाडीची सरकारे असताना जास्त प्रगती झाली असे वाटू लागले आहे. स्वबळावर सत्ता मिळाल्यावर त्या संधीचे सोने करायचे त्याऐवजी देशात ७५ वर्षांत काहीच झाले नाही असे सांगत बसत सत्तेच्या संधीची माती करत आहेत. देशातील सत्ता मिळाल्यावर आता राज्यातील, महापालिकेतील, गल्लीतील सत्ताही त्यांना हवी आहे. सर्व काही तुम्हाला हवे तर मग आम्ही काय धुणीभांडी करायची का, असा सवाल करत केंद्रात बसून राज्यांची मुस्कटदाबीचे राजकारण करायचे याचा राज्यांनी निषेध केला पाहिजे. भाजप नको यापेक्षा देश कसा हवा, राजकारण कसे हवे यासाठी देश आणि राज्याच्या हितासाठी महाराष्ट्रात जे केले ते राष्ट्रीय पातळीवरही करायची तयारी आहे. सगळे एकत्र आले तर नक्कीच करू, असा मानस उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. सत्तेसाठी हिंदूुत्वाचा वापर भाजप करत असल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच करोनानंतर आता विकृतीची लाट आली आहे. ती लाट आता रोखावी लागेल, असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला.

पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र सोडला तर केंद्रीय यंत्रणांकडे दुसरे राज्य नाही का? गुजरातमध्ये मोठा घोटाळा उघड झाला. आपल्याकडे चिमूटभर सापडले तर गहजब केला जातो. महाराष्ट्रात सगळीकडे गांजाची शेती होते आहे असे चित्र उभे करायचे. महाराष्ट्र जणू काही देशातला सगळय़ात सडका भाग आहे अशा पद्धतीने छापे मारायचे व महाराष्ट्राला बदनाम करायचे हे षडयंत्र आहे. ठीक आहे. प्रत्येकाचे दिवस असतात. दिवस बदलतात हे लक्षात ठेवावे, असा इशाराही मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपला दिला. भाजपशी वैचारिक पातळीवर युती झाली होती. पण आता पातळीच घसरली आहे. भाजपचा विचारही बदलला. ते आता जे काही करत आहेत त्यात सुधारणा शक्य आहे का, असा सवाल करत भाजपशी पुन्हा युतीची शक्यता ठाकरे यांनी फेटाळून लावली.

महाराष्ट्रात कोणत्याही पक्षाची स्वबळावर सत्ता येऊ शकेल अशी परिस्थिती नाही. त्यामुळेच किमान समान कार्यक्रमावर आधारित आघाडी सरकार चालवत आहोत. पण तरीही गावागावात शिवसेना मजबूत करण्याचे उद्दिष्ट सोडलेले नाही, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.

आधी अधिवेशन मग मंत्रालयात जाणार..

शस्त्रक्रियेनंतर आता तब्येत सुधारत असून आधी विधिमंडळ अधिवेशनाला व नंतर मंत्रालयात जाणे सुरू करणार असल्याचेही ठाकरे यांनी सांगितले. मी पुन्हा येईन यावर अनेकांचा विश्वास नव्हता. पण सलग तिसऱ्या वर्षी आलो आहे. पुन्हा येईन असे सांगून न येण्यापेक्षा हे बरे. यात गंमत आहे, असा टोला मुख्यमंत्री ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

शिवरायांच्या मराठीसाठी हात का पसरावेत?

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर का होईना, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा करावी. मराठी ही छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा असून छत्रपतींच्या मातृभाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची तुमची पात्रता आहे का? हा दर्जा देण्यासाठी केंद्र सरकारपुढे हात का पसरावे लागावेत, असा संतप्त सवाल ठाकरे यांनी केला.

आम्ही फुले वाहणार

मला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे बोलता येत नाही. त्यांचा काळ वेगळा होता. त्यांनी दगडातून मूर्ती घडवावी अशी शिवसेना घडवली. आता आम्ही तसेच घण घातले तर मूर्ती फुटेल. आमचे काम त्या मूर्तीवर फुले वाहण्याचे आहे. मी तेच काम करत आहे. आदित्य ठाकरे त्याच्या पद्धतीने काळानुसार त्याचे काम करत आहे. आदित्यमुळे ‘ग्लोबल वॉर्मिग’चा विषय राज्याच्या पर्यवरणाच्या ऐरणीवर आला असेल पण शिवसेनेमुळे ‘नॅशनल वार्मिग’ होत आहे, हे नक्की, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

‘लोकसत्ता’च्या अमृतमहोत्सवी वर्षांतील पदार्पणानिमित्त शुक्रवारी ‘लोकसत्ता वर्षवेध’ या विशेषांकाचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, उद्योगमंत्री सुभाष देसाई, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यावेळी उपस्थित होते. ‘वर्षवेध’ या विशेषांकात २०२१ सालातील प्रमुख घडामोडींचा वेध घेण्यात आला आहे.

’मुख्य प्रयोजक : वर्ल्ड वेब सोल्युशन्स

’सहप्रायोजक : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ,  सिडको,  महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, रुणवाल ग्रुप, रावेतकर ग्रुप

’बँकिंग पार्टनर : टीजेएसबी सहकारी बँक लि.

’पॉवर्ड बाय पार्टनर :  पर्यटन संचलनालय, महाराष्ट्र, वरद प्रॉपर्टी सोल्युशन्स प्रा. ली.,  पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, पुणे, दोस्ती रिअल्टी,  अंजुमन इस्लाम, मुंबई , राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलाइजर्स लि. 

’एज्युकेशन पार्टनर : सूर्यदत्त ग्रुप ऑफ इस्न्टिटय़ूट

’सहाय्य : जमीन प्रा. लि.