पाकिस्तानी क्रिकेट संघाशी सामने खेळविले जावेत, ही ‘आमची इच्छा’ असून मुंबईत सामने झालेच तर त्याला कडेकोट पोलीस संरक्षण पुरविले जाईल, असे रोखठोक प्रतिपादन करीत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेला खुले आव्हान दिले. पाकिस्तानी कलावंत किंवा खेळाडूंना विरोध करण्याची शिवसेनेची भूमिका भाजपला अजिबात मान्य नसल्याचे दानवे यांनी स्पष्ट केल्याने, आता शिवसेना आणि भाजप यांच्यातील ‘सामना’ रंगणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत. भारतीय क्रिकेटपटू अनेक देशांमध्ये जात असल्याची जाणीव ठेवावी, असा टोलाही दानवे यांनी शिवसेनेला लगावला.

पाकिस्तानशी क्रिकेट खेळण्यास शिवसेनेचा गेल्या अनेक वर्षांपासून तीव्र विरोध आहे. वानखेडे मैदानावरील खेळपट्टीही शिवसेनेने उखडली होती. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष शशांक मनोहर आणि पाकिस्तान क्रिकेट नियामक मंडळाचे शहरयार खान यांची सोमवारी भारत-पाक सामन्यांसंदर्भात चर्चा होणार असल्याची कुणकुण लागताच शिवसैनिकांनी क्रिकेट नियामक मंडळाच्या कार्यालयात जाऊन धडक दिली. त्या पाश्र्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका स्पष्ट केली. भाजपबरोबर सत्तेमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेच्या भूमिकेशी आपला पक्ष सहमत नाही, असा स्पष्ट संदेशच दानवे यांनी दिला आहे. मुंबईत क्रिकेट सामना खेळविला गेल्यास शिवसेनेच्या नाकावर टिच्चून पोलीस संरक्षण देण्याची भूमिका भाजप प्रदेशाध्यक्षांनी जाहीर केली आहे. त्यामुळे त्याचे शिवसेनेतही पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेने बीसीसीआयच्या कार्यालयात केलेल्या आंदोलनास भाजपचा अजिबात पाठिंबा नाही, असे दानवे यांनी ठणकावून सांगितले. पाकिस्तानी खेळाडू किंवा अन्य कोणीही आपली परवानगी घेऊनच देशात येत असतात. त्यामुळे त्यांना संरक्षण देणे हे आपले कर्तव्यच आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

आपल्या देशातील खेळाडूही अन्य देशांमध्ये जात असतात. त्यामुळे पाकिस्तानी क्रिकेट संघाशी सामने किंवा अन्य कार्यक्रमांमध्ये शिवसेनेने अडथळे आणू नयेत. त्याला विरोध करून गोंधळ घालणे योग्य नाही, असे दानवे यांनी सुनावले. पाकिस्तानबरोबरच्या संबंधांबाबत भाजपची भूमिका कायम असून त्यात कोणताही बदल नाही, असेही त्यांनी सांगितले.