नालेसफाई घोटाळ्यावरून शीतयुद्ध; भाजपचा रोख शिवसेना पक्षप्रमुखांकडे
नालेसफाईमध्ये झालेला घोटाळा उजेडात आणल्यानंतर आता पालिकेमध्ये सत्ताधारी शिवसेना आणि भाजपमध्ये शीतयुद्ध सुरू झाले आहे. भाजपने नाव न घेता थेट शिवसेना पक्षप्रमुखांकडे अंगुलीनिर्देश करीत शिवसेनेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रयत्न केला. तर नाल्यांची सफाई झालेली नाही असा चौकशी अहवालात कुठेही उल्लेख नसल्याचे सांगत नालेसफाईबद्दल समाधान व्यक्त करणाऱ्या पक्षप्रमुखांची पाठराखण करण्याची धडपड शिवसेनेकडून करण्यात येत आहे. मात्र या शीतयुद्धात भाजप वरचढ होऊ लागली आहे.
मुंबईमध्ये पावसाळ्यापूर्वी मोठय़ा नाल्यांच्या सफाईसाठी ३२ कंत्राटे देण्यात आली होती. जूनमध्ये कोसळलेल्या मुसळधार पावसात मुंबई जलमय झाली आणि नालेसफाईबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यामुळे पालिका आयुक्त अजय मेहता यांनी नालेसफाईच्या चौकशीचे आदेश दिले. या चौकशीमध्ये एकच वाहन अनेक कंत्राटांमध्ये वापरल्याचे, वजनकाटय़ावरील पावत्यांमध्ये अनियमितता आढळून आली. तसेच वाहून नेलेल्या गाळाचे वजन, गाळ टाकण्यात आलेले ठिकाण आदींची माहिती समितीला मिळाली नाही. सरकारच्या टोल नाक्यांवरील सीसी टीव्हीचे चित्रणही समितीला उपलब्ध होऊ शकले नाही. परिणामी नालेसफाईत घोटाळा झाल्याचे चौकशीअंती निष्पन्न झाले. या प्रकरणातील दोषींविरुद्ध कारवाई करण्याबाबत सत्ताधारी मित्रपक्ष शिवसेना-भाजपचे एकमत असले. तरी उभयतांमधील शीतयुद्ध नालेसफाई घोटाळ्याच्या निमित्ताने तीव्र होण्याची चिन्हे आहेत. उभय पक्षांच्या नेत्यांनी गुरुवारी पालिका मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन घोटाळ्यावर मतप्रदर्शन केले. सुरुवातीपासूनच नालेसफाईची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावेळी केलेल्या आरोपात तथ्य होते, असा दावा आता भाजप नेते करू लागले आहेत. पक्ष अथवा नेत्यांचा नामोल्लेख न करताच दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांवर गाळफेक केली. या घोटाळ्याला शिवसेना-भाजपच जबाबदार असल्याचा सूर काँग्रेसनेही आळवला.

नालेसफाई झाली नाही असे या अहवालात कुठेही म्हटलेले नाही. मुंबईत नालेसफाई झाली, पण उपसलेला गाळ मोजण्यात आणि तो क्षेपणभूमीत टाकण्यात घोटाळा झाला आहे. दोषी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. कामावर देखरेख करण्यात प्रशासनाचा हलगर्जीपणा झाल्याचे या घोटाळ्यामुळे स्पष्ट झाले आहे
-यशोधर फणसे
अध्यक्ष, स्थायी समिती
नालेसफाईमध्ये घोटाळा होत असल्याची ओरड सुरुवातीपासून भाजप करीत होता. पण शंभर टक्के नालेसफाई झाल्याचा दावा करीत समाधान व्यक्त केले जात होते. आता घोटाळा उजेडात आला आहे. त्यामुळे कंत्राटदारांची चौकशी करावी आणि संबंधित कंत्राटदार, अधिकारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा.
-मनोज कोटक
भाजप गटनेते
प्रशासनाने नालेसफाईत झालेला घोटाळा उजेडात आणला असला, तरी त्यात शिवसेना-भाजपनेच मोठा भ्रष्टाचार केला आहे. दोन्ही पक्षाचे नेते आता अधिकारी आणि कंत्राटदारांवर टीका करीत आहेत. ही या दोन्ही पक्षांची मिलीभगत आहे. त्यामुळे कोणत्या कंत्राटदारांचे कोणत्या नेत्यांशी संबंध आहेत, हेही शोधून काढावे.
-देवेंद्र आंबेरकर विरोधी पक्षनेता

Mumbai, Two arrested,
मुंबई : वृद्धाचे सोने लुटणाऱ्या दोघांना अटक
Ram Navami, High Court, State Govt,
रामनवमीला खबरदारी घ्या! उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा
Race for immersion on Rangpanchami in the five rahadis of the Peshwa era
नाशिकमध्ये रहाडींमध्ये डुंबण्याची चढाओढ यासाठी…