पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना केल्याने राजकीय पक्षांकडून होणाऱ्या टीकेला उत्तर देताना भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांना जाणता राजा म्हटलेलं कसं चालतं ? अशी विचारणा केली आहे. तसंच यावेळी त्यांनी ‘आज के शिवाजी’ या पुस्तकावरुन पक्षाची भूमिका मांडली. जोपर्यंत ब्रम्हांड आहे तोपर्यंत शिवरायांची तुलना होऊ शकत नाही असंही यावेळी त्यांनी सांगितलं. “जाणता राजा ही छत्रपती शिवाजी महाराजांसाठी वापरली जाणारी उपमा आहे. ती उपमा शरद पवार यांच्यासाठी सर्रास वापरली जाते. ते तुम्हाला चालते. इंदिरा गांधी यांना ‘इंदिरा इज इंडिया’ असं म्हटलं गेलं आहे. तेही तुम्हाला मान्य आहे,” अशी आठवण त्यांनी विरोधकांना करुन दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“राईचा पर्वत करण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत. अत्यंत नीच दर्जाचं राजकारण केलं जात आहे. इंदिरा गांधींनी जेव्हा बांगलादेशविरोधातील युद्ध जिंकलं तेव्हा त्यांना दुर्गादेवीचा अवतार म्हणण्यात आलं होतं. दुर्गादेवीची बरोबरी इंदिरा गांधी कधीच करु शकत नाही हे माहिती होतं. पण एखाद्या व्यक्तीचा गौरव करताना असं वक्तव्य अनेकदा केलं जातं. ‘इंदिरा इज इंडिया, इंडिया इज इंदिरा’ असंही म्हणण्यात आलं होतं. शरद पवार यांना छत्रपती शिवाजी महाराजांची जाणता राजी ही उपाधी देण्यात आली होती. शरद पवारांवर जाणता राजा नावाने पुस्तक निघालं. त्यांच्या कार्यकाळात ३५ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. मग शरद पवारांवरील पुस्तकाला जाणता राजा नाव का देण्यात आलं ? महाराजांशिवाय ही उपाधी कोणालाही लागत नाही. जाणता राजा म्हणजे गावचा सपरंच नव्हे,” अशा शब्दांत सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांवर टीका केली.

आणखी वाचा – ‘आज के शिवाजी -नरेंद्र मोदी’ पुस्तकाचे भाजपा कार्यालयात प्रकाशन

“या देशात शिवाजी महाराज पुन्हा जन्माला येणं शक्यच नाही हे खरं आहे. जोपर्यंत ब्रम्हांड आहे तोपर्यंत कोणीही त्यांच्या तुलना करु शकत नाही. नरेंद्र मोदीदेखील करु शकत नाहीत,” असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे. “पण मोदी देशाला ज्याप्रमाणे विकासाच्या मार्गावर नेत आहेत, देशाची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न करत आहेत, अनेक जटील प्रश्न सोडवले त्यामुळेच त्यांच्याबद्दल घाणेरडं राजकारण केलं जात आहे,” असा आरोप त्यांनी केला. इंदिरा गांधींना दुर्गादेवीची उपमा दिली तेव्हा यांचे कंठ कुठे गेले होते ? अशी विचारणा यावेळी त्यांनी केली.

आणखी वाचा – ही तर भक्तांची चमचेगिरी, नरेंद्र मोदींची काही चूक नाही – संजय राऊत

संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर देताना, पवारसाहेब जाणता राजा कधीच होऊ शकत नाही. सरकारनेही राजीनामा दिला पाहिजे. मग महाराजांचे वंशजही राजीनामा देतील असं प्रत्युत्तर दिलं. “हे पुस्तक काही अतिउत्साही कार्यकर्त्यांचं काम आहे. तामिळनाडूत इंदिरा गांधींचं मंदीर बांधण्यात आलं होतं. मोदींना जेव्हा आपलं मंदीर बांधण्याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी फटकारलं होतं. काही अतिउत्साही कार्यकर्ते असतात पण यामुळे ही पक्षाची भूमिका आहे म्हणणे चुकीचं आहे,” असं यावेळी त्यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp sudhir mungantiwar pm narendra modi chhatrapati shivaji maharaj book sharad pawar sgy
First published on: 13-01-2020 at 12:12 IST