कामगार-कर्मचाऱ्यांना भेडसावणारे प्रश्न सोडविण्याच्या निमित्ताने भाजपने आता हिंदुस्थान मजदूर संघाच्या माध्यमातून कामगार क्षेत्रात उडी घेतली आहे. कामगार हिताचे कारण पुढे करण्यात आले असले तरी शिवसेनेचे बलस्थान असलेल्या पालिकेतील कर्मचारी-कामगार सेनेला शह देण्याचा त्यामागे छुपा हेतू असल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू झाली आहे.

भाजपने हिंदुस्थान मजदूर संघ ही कामगार संघटना ताब्यात घेतली असून या संघटनेच्या अध्यक्षपती अ‍ॅड. पराग अळवणी, सल्लागारपदी मधू चव्हाण, कार्याध्यक्षपदी व्ही. आनंदराज, आणि सरचिटणीसपदी डॉ. संजय कांबळे-बापेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पालिका मुख्यालयात गुरुवारी या संघटनेतर्फे पराग अळवणी आणि मधू चव्हाण यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी ही संघटना कार्यरत राहणार असून केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असल्याने कामगारांना न्याय मिळवून देण्यात यश येईल, असा विश्वास पराग अळवणी यांनी यावेळी व्यक्त केला.
शिवसेनाप्रणीत म्युनिसिपल कर्मचारी, कामगार सेनेला शह देण्यासाठी भाजपने कामगार क्षेत्रात प्रवेश केला का, असा प्रश्न विचारला असता अळवणी म्हणाले की, ही संघटना केवळ कामगारांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे. राजकारणापासून ही संघटना दूर राहणार असल्याचे सांगितले.