न्यायालयीन लढा देण्याची तयारी सुरू; या उपक्रमामुळे गर्दी वाढण्याची शक्यता

‘दिल्ली हाट’च्या धर्तीवर धोबीतलावमधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके चौकातील पादचारी भुयारी मार्गात महिला बचत गटांच्या उत्पादनांना ‘मुंबई हाट’च्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या भाजपच्या योजनेविराधात शिवसेना दंड थोपटून उभी राहिली आहे. या ठिकाणी नवोदित कलाकार आणि विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन मांडण्याची योजना खुद्द शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी मांडली होती. ती पालिकेने धुडकावून लावली. परंतु, पालिकेच्या पूल आणि अग्निशमन दलाने मुंबई हाटच्या योजनेला लाल कंदिल दाखविला असतानाही पालिका ही योजना पुढे रेटू पाहते आहे. त्यामुळे, खवळलेल्या शिवसेनेने ‘मुंबई हाट’च्या विरोधात न्यायालयीन लढा देण्याची तयारी सुरू केली आहे.

महिला बचत गटांना आपल्या उत्पादनांची विक्री करण्यासाठी वासुदेव बळवंत चौकातील भुयारी पादचारी मार्गामध्ये जागा उपलब्ध करण्यात यावी, असे दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिकेला सूचित केले होते. त्यानंतर पालिकेने या दृष्टीने चाचपणी केली. हा मार्ग केवळ पादचाऱ्यांकरिताच बांधण्यात आला आहे, असे पालिकेच्या पूल विभागाने प्रशासनाला कळवले होते. तर अग्निशमन दलानेही या संदर्भात नकारात्मक शेरा मारत या ठिकाणी गर्दी होतील असे उपक्रम सुरू करता येणार नाही, असे कळविले आहे. तरीही पालिकेचा ‘मुंबई हाट’चा आग्रह कायम आहे. त्यामुळे, ठाकरे यांची नवोदित कलाकार आणि विद्यार्थ्यांच्या कलेला व्यासपीठ मिळवून देण्याची कल्पना धुडकावणाऱ्या पालिकेला मुंबई हाट कशी चालते, असा प्रतिष्ठेचा मुद्दा करत शिवसेना मैदानात उतरली आहे. शिवसेनेचे नामनिर्देशीत नगरसेवक प्रा. अवकाश जाधव यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून भुयारी मार्गाच्या वापराबाबत पादचारी, स्थानिक रहिवाशी, दुकानदार आदींचे मत जाणून घेतले होते. त्यामध्ये बहुतांश लोकांनी ‘मुंबई हाट’ला विरोध दर्शविला होता. याबाबतचा अहवाल जाधव यांनी अलिकडेच पालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेऊन सादर केला आहे.