यंदाच्या ‘थर्टी फर्स्ट’च्या रात्री तसेच एक जानेवारी रोजी म्हणजेच सोमवारी व मंगळवारी लघुसंदेश पाठविण्यात कोणतीही सवलत मोबाईल सेवा देणाऱ्या कंपन्यांकडून दिली जाणार नसून हे दोन दिवस ‘ब्लॅकआऊट डे’ म्हणून जाहीर केले आहेत.‘ब्लॅकआऊट डे’ जाहीर करणाऱ्या कंपन्यांमध्ये व्होडाफोन इंडिया, एअरसेल, भारती एअरटेल, रिलायन्स टेलिकॉम, एसटेल, व्हिडिओकॉन मोबाईल सव्‍‌र्हिस, टाटा टेलिसव्‍‌र्हिसेस, बीएसएनएल, लूप मोबाईल, एमटीएनएल अशा सर्वच कंपन्यांचा समावेश आहे. प्रीपेड तसेच पोस्टपेड मोबाईलधारकांनाही त्यांच्या ‘प्लॅन’प्रमाणे नव्हे तर त्याहूनही अधिक दर लागू केले जाणार आहेत. लघुसंदेश पाठविण्यासाठी मोबाईलधारकांना मोफत लघुसंदेश देण्याची सोय असलेली संकेतस्थळे, इंटरनेट-तसेच मोबाईलवर उपलब्ध असलेल्या चॅटिंगच्या मोफत सुविधा वापरण्याचा मार्ग स्वीकारणे हितकारक ठरणार आहे.     
नववर्ष पूर्वसंध्येवर ‘त्या’ दुर्घटनेचे सावट
दिल्लीतील सामूहिक बलात्कारातील पीडित तरूणीच्या मृत्यूचे सावट दिल्लीप्रमाणे देशाच्या आर्थिक राजधानीतील नवीन वर्षांच्या स्वागतसंध्येवरही पडण्याची शक्यता आहे. मृत्युमुखी पडलेल्या मुलीला श्रद्धांजली वाहण्यासाठी ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’ने ‘आय डोन्ट अटेन्ड न्यू इयर पार्टी,’ असा संदेश तरुणांमध्ये पसरविण्यास सुरुवात केली आहे. तसेच, नवीन वर्ष ‘महिला सुरक्षा वर्ष’ पाळावे, असे आवाहन केले आहे.