कमला मिल….मुंबईतल्या जुन्या मिलपैकी एक…. ही मिल बंद पडली आणि पाहता पाहता या मिलच्या आवारात गगनचुंबी इमारती उभ्या राहिल्या…या कमला मिल परिसरात हळूहळू पब आणि रेस्तराँची संख्या वाढली आणि अवघ्या काही वर्षांत हा परिसर हायप्रोफाईल पार्टी हबच झाला… गुरुवारी रात्री देखील ‘वन अबव्ह’ या रुफटॉप पबमध्ये अनेक जण पार्टीसाठीच आले होते.. कोणाच्या वाढदिवसाची पार्टी होती तर कोणी माय-लेकी डिनरसाठी आल्या होत्या… मात्र काळाने घात केला आणि अग्नितांडवात १४ जणांचा मृत्यू झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या आठवड्यात गुजरात निवडणुकीसाठी मतमोजणी सुरु असतानाच साकीनाका येथील फरसाणच्या कारखान्यात आग लागून १२ जणांचा मृत्यू झाला. आता गुरुवारी कमला मिलमधील ‘वन अबव्ह’ या रुफटॉप पबमध्ये लागलेल्या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला. दोन्ही घटनांमध्ये साधर्म्य एकच… मालकांची गल्लाभरु मानसिकता आणि निर्लज्ज व बेजबाबदार प्रशासन.

कमला मिलमध्ये अनेक वृत्तवाहिन्या तसेच ख्यातनाम बँकाची कार्यालये व कॉर्पोरेट ऑफीस आहेत. साधारणतः दीड वर्षांपूर्वी कमला मिल कम्पाऊंडमधील एका मराठी वृत्तवाहिनीत काम करत होतो. दिवस असो किंवा रात्र… कमला मिल कम्पाऊंडमध्ये बऱ्यापैकी वर्दळ असतेच. या कंपाऊंडमध्ये बारा महिने काम सुरु असते…..या कम्पाऊंडमध्ये दुचाकीसाठी त्यावेळी प्रति महिना किमान सातशे ते दिड हजार तर चार चाकी गाड्यांसाठी चार हजार पेक्षा जास्त रुपये उकळले जायचे. हा मासिक पासचा हिशोब झाला…तासानुसार पैसे देणाऱ्या वाहनांमुळे होणारी कमाई वेगळी.. पण पार्किंगच्या जागेवरही आता बिनधास्त बांधकाम होताना दिसते. मिलच्या सहा नंबरच्या गेटजवळ पार्किंगसाठी मोकळी जागा होती. तिथे गाड्यांचे पार्किंग होते. काही दिवसांनी पार्किंगच्या जागेवरील काही भाग कालांतराने गो कार्टींगसाठी दिला गेला. हीच अवस्था पब आणि रेस्तराँची… पूर्वी वृत्तवाहिन्यांच्या गाड्यांसाठी राखीव असलेल्या जागेवर कालांतराने लंडन टॅक्सी नामक अलिशान रेस्तराँ सुरु झाले. जमिनीवर जागा उरली नसल्याने मालकांची नजर बहुधा गच्चीकडे गेली असावी. या इमारतींच्या गच्चीवर रुफटॉप हॉटेल सुरु करुन तिथूनही गल्ला भरण्याची शक्कल मालकांनी लढवली. महापालिकेत सत्ता असणाऱ्या पक्षाचे ‘युवराज’ही रुफटॉप हॉटेल, नाईट लाईफसाठी आग्रही असल्याने त्यासाठी परवानगी मिळवणे रेस्तराँ मालकांना अवघड गेले नसावेच.

महापालिका प्रशासनाकडून परवानगी मिळवली की मग सर्रास नियम पायदळी तुडवून धंदा केला जातो. आता ज्या पबमध्ये आग लागली तिथे ताडपत्री आणि बांबूचा वापर करुन शेड टाकली होती. आता अशा ठिकाणी रात्रींचे बारटेंडर आगीचे खेळ करुन दाखवतो. टेबलवरच हुक्का दिला जातो. हुक्का पॉटमध्ये कोळशाचे निखारे असतात. याच्या ठिणग्याही उडत असतात. त्यामुळे अशा ठिकाणी प्लास्टिक आणि बांबूचा वापर किती धोकादायक ठरेल हे दुधखुळ्या मुलालाही समजेल. पण निर्लज्ज प्रशासनाचे याकडे लक्ष गेले नसावे.
भारतात जिवाची किंमत नाही, असे नेहमीच म्हटले जाते. कुर्लातील फरसाण मार्ट असो किंवा एल्फिन्स्टनमधील ब्रिजवरील चेंगराचेंगरीची दुर्घटना… आठवडाभर त्यावर चर्चा होते, सरकार आणि प्रशासन जाग आल्याची नाटकं करते आणि कालांतराने या घटना लोक विसरुन जातात. या घटनेतील आरोपी हे श्रीमंत आहेत… पण जीव गमावणारेही उच्चभ्रूच आहेत… त्यामुळे कदाचित या दबावातून तरी कुंभकरण प्रशासनाला खरंच जाग येऊ दे आणि आरोपी दोषी ठरु देत हीच खरी मृतांना श्रद्धांजली राहील.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Blog kamala mills compound fire one above rooftop pub bmc shiv sena kamala mill owner
First published on: 29-12-2017 at 14:14 IST