निर्धारित दरापेक्षा जास्त शुल्क आकारणाऱ्या २५ रक्तपेढय़ांना नोटीस

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेने २०१४ साली निश्चित केलेल्या रक्तपिशवी आणि प्लाझमा, प्लेटलेट्स या घटकांच्या दरापेक्षा अधिक शुल्क रक्तपेढय़ांकडून वसूल करण्यात येत असल्याचे उघड झाले आहे. मुंबईतील २५ खासगी रक्तपेढय़ा एका रक्तपिशवीच्या विक्रीतून ५० ते दीड हजार रुपयांपर्यंत जादा शुल्क लाटत असल्याचे रक्त संक्रमण परिषदेच्या तपासणीत स्पष्ट झाले आहे. याची गंभीर दखल घेत परिषदेने गेल्या आठवडय़ात या रक्तपेढय़ांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेने तीन वर्षांपूर्वी रक्तपिशवी व अन्य संबंधित घटकांचे दर निश्चित करताना सरकारी रक्तपेढय़ांपेक्षा खासगी रक्तपेढय़ांमध्ये अधिक दर ठरवले होते. सरकारी रक्तपेढय़ांना रक्तपिशवीसाठी ८५० आणि खासगी रक्तपेढय़ांना १४५० दर नेमून देण्यात आला आहे. मात्र त्यानंतरही अनेक रक्तपेढय़ांमध्ये १४५० हून जास्त आकारणी केली जात आहे. काही ठिकाणी ही दरआकारणी ५० रुपयांनी जास्त तर काही पंचतारांकित रुग्णालयात रुग्णाला एका रक्तपिशवीसाठी ३३०० रुपये मोजावे लागत आहे, असे परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या संकेतस्थळावर सर्व रक्तपेढय़ांची माहिती उपलब्ध करण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून रक्तपेढय़ांकडून माहिती मागवली जात आहे.

‘रुग्ण आणि रक्तपेढय़ांमधील पारदर्शकतेसाठी हा उपक्रम राबविला जात आहे. रक्तपेढय़ांमधील माहिती गोळा करीत असताना अनेक रक्तपेढय़ा जास्त दर आकारत असल्याचे परिषदेच्या निदर्शनास आले. यानंतर तातडीने या २५ रक्तपेढय़ांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या,’ अशी माहिती परिषदेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. काही रक्तपेढय़ांना जास्त दर आकारणीमागे रक्ततपासणी प्रक्रियेच्या खर्चाचे कारण दिले आहे. याची पडताळणी करण्यासाठी स्वतंत्र तपासणी समिती स्थापन करण्याचा विचार सुरू असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले. काही रक्तपेढय़ांनी ‘निष्काळजी’मुळे दर वाढल्याचे कबूल करीत यापुढे निर्धारित दराने आकारणी करण्याचे मान्य केले आहे. नोटीस पाठविल्या जाणाऱ्या अनेक रक्तपेढय़ा पंचतारांकित रुग्णालयातील आहेत. या रक्तपेढय़ांना नोटीस पाठवून दर आकारणी कमी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यापुढेही अन्न व औषध प्रशासनाकडे या रक्तपेढय़ांच्या तपासणीची जबाबदारी सोपविण्यात येईल, अशी माहिती या अधिकाऱ्याने दिली.

तपासणीची आवश्यकता

विविध तपासण्या केल्या जात असल्याने रक्तपिशवीचे दर महागल्याचा खुलासा रक्तपेढय़ांकडून देण्यात आला आहे. मात्र या तपासण्या केल्या जात आहेत का याची तपासणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन आणि राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, असे काही सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

या रुग्णालयांच्या रक्तपेढय़ांना नोटिसा

हाइमेटॉलॉजी लॅबोरॅटोरी, बाळाभाई नाणावटी, होली फॅमिली, बी.डी.पेटिट पारसी जनरल, जसलोक, सर एच.एन., बॉम्बे, पी.डी.हिंदुजा, एशियन हार्ट, लीलावती, फोर्टिस, मसिना, एस.एल.रहेजा, मीनाताई ठाकरे (प्रबोधन), सैफी, महात्मा गांधी सेवा मंदिर, मानस सेरोलॉजिकल, कोहिनूर, ब्रीचकॅण्डी, पल्लवी, ग्लोबल, शीव रक्तपेढी, सबरबन हायटेक, कोकिलाबेन धीरुभाई अंबानी, बाळासाहेब ठाकरे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Blood bag scam in mumbai
First published on: 03-01-2018 at 01:24 IST