अडथळा आणणाऱ्यांवर पोलिसांचा लाठीमार; ४१ जण अटकेत
पालिका आयुक्तांच्या आदेशानुसार मानखुर्द येथील पालिकेच्या विभाग कार्यालयाने शिवाजीनगरमधील तीन झोपडय़ांवरील अनधिकृत दोन मजले जमीनदोस्त केले. ही कारवाई सुरू होताच शिवाजीनगरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. कारवाईत अडथळा निर्माण करणाऱ्या स्थानिक रहिवाशांवर पोलिसांनी लाठीमार केला. त्यात काही जण जखमी झाल्याचे समजते. तसेच १६ पुरुष आणि २५ महिला अशा एकूण ४१ जणांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुंबईतील १४ फुटांवरील झोपडय़ांवर कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले होते. त्यानंतर संपूर्ण मुंबईमध्ये सर्वेक्षण करून १४ फुटांहून अधिक उंची असलेल्या झोपडय़ांची यादी तयार करण्यात आली. त्यानंतर संबंधित झोपडीधारकाला नोटीस बजावण्यात आली. पावसाळा संपल्यामुळे पालिकेने या झोपडय़ांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे.
मानखुर्द येथील एम-पूर्व विभाग कार्यालयाने बुधवारी शिवाजीनगरमधील पथ क्रमांक ३ येथील भूखंड क्रमांक ४५ वरील १४ फुटांपेक्षा अधिक उंच अशा तीन झोपडय़ांवर कडेकोट पोलीस बंदोबस्तात कारवाई केली. ही कारवाई सुरू होताच स्थानिक रहिवाशांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. कारवाईमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्यांवर पोलिसांना लाठीमार करावा लागला.
कारवाईत अडथळा निर्माण करणारे १६ पुरुष आणि २५ महिलांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली. या तिन्ही झोपडय़ा २० वर्षे जुन्या होत्या. पोलिसांनी लाठीमार केला त्याच वेळी शाळा सुटली होती आणि मुले घरी जात होती. मात्र लाठीमार होताच गोंधळ उडाला आणि त्यात १० ते ११ मुलांना खरचटल्याचा दावा स्थानिक नगरसेवक रईस शेख यांनी केला.