गरीबनगर झोपडपट्टीत प्रतिबंधात्मक उपाय योजण्याचे महापालिकेचे संकेत
आग लागल्याने वांद्रे परिसरातील गरीबनगर झोपडपट्टीतील अतिक्रमणे हटवण्याचे काम थांबवावे लागले असले, तरी सोमवारपासून पुन्हा एकदा कारवाई हाती घेतली जाणार आहे. यापूर्वीही अतिक्रमणे हटवताना स्थानिकांचा विरोध तसेच आग लागण्याच्या घटना घडल्याने त्यादृष्टीने प्रतिबंधात्मक उपाय योजूनच कारवाई हाती घेतली जाईल, असे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले.
जलवाहिनीच्या परिसरातील अतिक्रमणे हटवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. येत्या डिसेंबर अखेपर्यंत ही अतिक्रमणे हटवणे गरजेचे आहे. शहरातील इतर भागातील अतिक्रमणांवर कारवाई केली जात असली, तरी वांद्रे पूर्व, कुर्ला तसेच वडाळा भागात अतिक्रमणे हटवताना पालिकेला विरोध सहन करावा लागत आहे. वांद्रे येथील गरीबनगर परिसरात अतिक्रमण हटवण्याची नोटीस बजावून त्यानंतर गुरुवारी कारवाई करण्यात आली. मात्र रेल्वे स्थानकानजिकच्या झोपडपट्टीत लागलेल्या आगीने भीषण रूप धारण केल्याने ही कारवाई आटोपती घ्यावी लागली.
यापूर्वीही अनेकदा या प्रकारची स्थिती निर्माण झाली आहे. अतिक्रमणे हटवताना अनेकदा आग लागते. मात्र न्यायालयाचा आदेश असल्याने ही कारवाई पुढे सुरू ठेवली जाणार आहे, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आगीत भस्मसात झालेल्या झोपडय़ांच्या आजूबाजूच्या परिसरात शुक्रवारी कारवाई केली गेली नाही. सोमवारपासून तानसा जलवाहिनीच्या इतर भागातील झोपडय़ाही तोडल्या जाणार असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
जलवाहिन्यांना धोका असल्याने दोन्ही बाजूंच्या दहा मीटर परिसरातील झोपडय़ा तोडण्याचे व कुंपण घालण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. सर्वेक्षणानुसार जलवाहिन्यांच्या बाजूला तब्बल १५,७८९ झोपडय़ा होत्या. या झोपडय़ा चार टप्प्यात हटवण्याची पालिकेची योजना होती. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील माटुंगा, भांडुप, घाटकोपर, मुलुंड, चेंबूर या परिसरातील झोपडय़ा हटवण्यात आल्या आहेत.
वांद्रेच्या आगीत घातपात?
वांद्रे पूर्वेकडील गरीबनगरातील आग अपघाताने लागलेली नसून त्यामागे घातपात असावा, असा दाट संशय निर्मलनगर पोलिसांना आहे. ‘लोकसत्ता’शी बोलताना एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने आगीनंतरच्या चौकशी व तपासातून ही आग लावण्यात आल्याचा संशय बळावला आहे. त्या दृष्टीने चौकशी सुरू आहे, असे सांगितले. मात्र इतक्यात निष्कर्षांवर पोहोचणे योग्य नाही, असेही त्याने पुढे स्पष्ट केले.
आग कशी लागली, नेमकी कुठे लागली व पसरली याबाबत अग्निशमन दलाकडून चौकशी सुरू आहे. निर्मलनगर पोलिसांनी वस्तीतील रहिवाशांसह प्रत्यक्षदर्शी, साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यास सुरूवात केली. यात कारवाईसाठी उपस्थित असलेल्या महापालिका अधिकारी, कर्मचारी व बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांचाही समावेश आहे. वस्तीतून ही आग पालिका अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे लागल्याचा आरोप होत आहे. कारवाईआधी या अधिकाऱ्यांनी घराघरात जाऊन घरगुती वापराचे गॅस सिलेंडर बाहेर काढले, खाली फेकले. त्यातून आग लागल्याचा दावा येथील रहिवासी करतात. तर पालिकेची कारवाई थांबावी यासह अन्य उद्देश मनात ठेवून ही आग लावण्यात आल्याचीही चर्चा होती.
परिमंडळ ८चे उपायुक्त अनिल कुंभारे यांना विचारले असता, सर्व दृष्टीकोनातून चौकशी सुरू आहे. काही जबाब नोंदवून पूर्ण झाले आहेत. चौकशी पूर्ण करून निष्कर्षांवर पोहोचल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.