नाल्यांवरील प्रार्थनास्थळे महापालिका लवकरच हटविणार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धारावी परिसरातील मुख्याध्यापक नाला आणि धोबीघाट नाल्याच्या साफसफाईत अडसर बनलेली प्रार्थनास्थळे तात्काळ तोडण्याचे आदेश पालिका आयुक्त अजय मेहता यांनी दिले आहेत. राजकीय नेत्यांकडून कारवाईत होणाऱ्या हस्तक्षेपाचीही आयुक्तांनी गंभीर दखल घेतली असून त्यांची नावे निवडणूक आयुक्तांना कळविण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. या नेत्यांना भविष्यात निवडणूक लढविता येऊ नये, अशी कारवाई निवडणूक आयोगाच्या माध्यमातून करण्याचा पालिका आयुक्तांचा मानस आहे.

धारावी आणि आसपासच्या परिसरातील पावसाच्या पाण्याचा मुख्याध्यापक नाला आणि धोबीघाट नाल्यातून निचरा होतो. पावसाळ्यापूर्वी पालिकेच्या जी-उत्तर विभागाने या नाल्यांच्या सफाईचे काम युद्धपातळीवर हाती घेतले होते. मात्र मुख्याध्यापक नाल्यावर जरीमरी मातेचे, तर धोबीघाट नाल्यावर कालिमातेचे मंदिर असल्याने त्याखालील सफाई करणे पालिकेला अशक्य बनले. यामुळे ही प्रार्थनास्थळे हटवून नाल्यांची साफसफाई करण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. तसेच पालिकेने ही मंदिरे दुसरीकडे स्थलांतरित करण्याची तयारीही दर्शविली होती. मात्र काही स्थानिक नागरिक आणि राजकीय पक्षांशी संबंधित असलेल्या संघटनांचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रार्थनास्थळांवरील कारवाईस विरोध केला. तरीही पालिका अधिकारी २६ मे रोजी कारवाई करण्यासाठी या नाल्यांवर पोहोचले; परंतु विरोधामुळे अधिकाऱ्यांना कारवाई न करताच माघारी परतावे लागले. मंदिरांवर कारवाई होऊ नये म्हणून धारावीमध्ये बंदही पाळण्यात आला होता. त्यानंतर २ जून रोजी कारवाई करण्यात येणार होती. मात्र हा प्रश्न संवेदनशील बनल्यामुळे पोलिसांच्या सल्ल्यानुसार कारवाई रद्द करण्यात आली.

संततधार पावसामुळे नाल्यांवरील प्रार्थनास्थळांमुळे पाण्याची कोंडी होऊन धारावी ते माटुंगा परिसर जलमय होण्याची भीती आहे. अजय मेहता यांनी पालिकेचे उपायुक्त, साहाय्यक आयुक्तांच्या आढावा बैठकीत या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता या प्रार्थनास्थळांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी या बैठकीत अधिकाऱ्यांना दिले.

 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmc demolish illegal prayer places very soon
First published on: 04-07-2016 at 00:34 IST