मुंबई महापालिका निवडणुकीत ८४ जागा जिंकून शिवसेना क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. तर राज्यातील निवडणुकांत क्रमांक एकवर असलेली भाजप मुंबईत मात्र, दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. मुंबईत आपल्याच पक्षाचा महापौर होणार, असा दावा उभय पक्षांकडून केला जात आहे. त्याचदरम्यान, मुंबईत शिवसेनाच, असा दावा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. भाजपकडे केंद्र आणि राज्यातील सत्तेची ताकद होती. पण शिवसैनिक वडापाव आणि भाकरी खाऊन रस्त्यावर लढला, असे उद्धव ठाकरे यांनी रात्री ट्विट करून सांगितले.

तत्पूर्वी मुंबईत महापौर शिवसेनेचाच होणार, असा ठाम विश्वास व्यक्त करीत पक्षावरची निष्ठा ढळू देऊ नका, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना केले. शिवसेनेच्या महापालिकेतील विजयी उमेदवारांचा मेळावा शिवसेना भवनमध्ये शनिवारी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी नवीन नगरसेवकांना मार्गदर्शन करताना ठाकरे यांनी महापौरपद शिवसेनेकडेच राहील व ते कोणालाही हिसकावून घेता येणार नाही, असा विश्वास व्यक्त केला होता. कोणत्याही आमिषांना बळी पडू नका आणि विश्वास व ध्येयनिष्ठा ढळू देऊ नका, असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. त्याच जोरावर शिवसेनेने या निवडणुकीत विजय मिळविला, असे ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

शिवसेनेला मिळालेले यश हे शिवसैनिकांच्या ताकदीशिवाय कधीही शक्य नव्हते. बाळासाहेबांनी दिलेल्या शपथेच्या आणि निष्ठेच्या शिकवणीवर, निखाऱ्यांवर शिवसैनिक वाटचाल करत आहे, असे त्यांनी सांगितले. ११ लाख मतदारांची नावे यादीतून गायब झाली नसती तर, आज चित्र वेगळे दिसले असते. आपल्या अनेक जागांवर अगदी थोड्या मतांच्या फरकामुळे विजय मिळवता आला नाही, असेही ते म्हणाले. दरम्यान महापौर शिवसेनेचाच होणार, पण दगाफटका होता कामा नये. प्रलोभने-अमिषांना बळी पडू नका, असे आवाहनही त्यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांना केले.

दरम्यान, मुंबईत शिवसेना – भाजपने एकत्र येण्याबाबत राजकीय पातळीवर काल दिवसभरात अनेक घडामोडी घडल्या. शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेसच्या काही नेत्यांनी वक्तव्ये केल्यानंतर भाजपचे नितीन गडकरी यांनीही शिवसेनेने युती करावी, त्याशिवाय कोणताही पर्याय नाही, असे म्हटले होते. त्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही शिवसेना-भाजपची युती व्हावी, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले होते. मुंबईकरांनी शिवसेना व भाजपा दिलेला कौल लक्षात घेता दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याची गरज असून त्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे. शिवसेनेने प्रस्ताव दिल्यास नक्की विचार करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले असून आपण लवकरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे आठवले यांनी सांगितले होते.