‘स्वच्छ मुंबई सुंदर मुंबई’च्या दिशेने एक पाऊल टाकत पालिकेने मुलुंड परिसरातील २५ खुल्या कचराकुंडय़ा हद्दपार केल्या असून घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे दररोज सकाळी ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला साचणारे कचऱ्याचे ढीग आणि त्यामुळे परिसरात पसरणाऱ्या दरुगधीला पूर्णविराम मिळू लागला आहे. परिणामी, अनेक ठिकाणचे आरोग्याचे प्रश्नही कमी होऊ लागले आहेत. त्यामुळे ही योजना आता संपूर्ण मुंबईत राबविण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी सर्व विभाग कार्यालयांतील सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत.
पालिकेच्या टी विभाग कार्यालयाच्या हद्दीत म्हणजेच मुलुंडमध्ये ‘खुली कचराकुंडी मुक्त परिसर’ मोहीम राबविण्यात येत आहे. सोसायटय़ा, वस्त्यांमध्ये घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्याचे काम पालिका कामगार करीत आहेत. प्रभाग क्रमांक १०३ धील १९, तर अन्य प्रभागांतील सहा ठिकाणच्या खुल्या कचराकुंडय़ा बंद करण्यात आल्या आहेत. उर्वरित खुल्या कचराकुंडय़ा लवकरच बंद करण्यात येणार आहे. या परिसरात घराघरातील कचरा आता कचरा गाडीतच गोळा करण्यात येत आहे. नागरिकही या गाडीमध्ये कचरा टाकू लागले आहेत. कचऱ्याबाबत भेडसावणारी तक्रार नागरिकांना एसएमएस अथवा वॉटस्अपद्वारे पालिका अधिकाऱ्यांकडे करता येणार आहे. त्यासाठी नागरिकांनी नागरिकांनी ९९७०००१३१२ वर संपर्क साधावा. प्रभाग क्रमांक १०३मध्ये दररोज सुमारे २४ मे. टन कचरा निर्माण होतो. या परिसरात दिवसातून दोन वेळा कचरागाडी फिरणार आहे.