पालिकेकडून पावणेपाच कोटींचा खर्च

मुंबई : मुंबई महापालिके ने पुन्हा एकदा यांत्रिकी झाडूच्या खरेदीचा घाट घातला असून यांत्रिकी झाडूची खरेदी व देखभालीपोटी तब्बल पावणेपाच कोटी रुपये खर्च करण्याची तयारी पालिके ने के ली आहे. एका झाडूने दर दिवशी सुमारे २८ कि.मी. लांबीच्या रस्त्याची सफाई करण्याचा मानस आहे. दरम्यान, पूर्वी खरेदी के लेल्या यांत्रिकी झाडूचा पुरेसा वापर होत नाही. तसेच यांत्रिकी झाडूंना सफाई कामगारांकडून कडाडून विरोध होत आहे. तरीही त्यांची खरेदी करण्यात येत असल्याने वाद उद्भवण्याची चिन्हे आहेत.

दिवसेंदिवस महानगरातील हवेची गुणवत्ता ढासळत असून त्याची दखल ‘राष्ट्रीय हरित प्राधिकरणा’ने घेतली आहे. प्रदूषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. त्यानुसार ‘राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम’ नावाची पंचवार्षिक योजना हाती घेण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत २०२४ पर्यंत हवेतील प्रदूषकांचे प्रमाण २५ ते ३० टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्टय़ ठेवण्यात आले आहे. या उपक्रमाअंतर्गत राज्य सरकारच्या ‘प्रदूषण नियंत्रण महामंडळाने’ मुंबई महानगरपालिकेला दहा कोटी रुपये निधी दिला आहे. या निधीतून प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाय पालिकेकडून केले जात आहेत. त्यातूनच यांत्रिक झाडू विकत घेण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

प्रत्येक यांत्रिक झाडूने दिवसाला किमान २८ कि.मी. लांबीचे रस्ते स्वच्छ केले जातील. तसेच दोन पाळ्यांमध्ये आठ तास काम करण्यात येणार आहे. या यांत्रिक झाडू खरेदीबरोबरच वर्षभराचे प्रचलन आणि देखभालीसाठीही निविदा मागवण्यात आल्या होत्या. हे प्रत्येक वाहन खरेदी करण्यासाठी पालिका ४५ लाख असे दोन कोटी २५ लाख रुपये खर्च करणार आहे. तर वर्षभराच्या देखभालीसह प्रचलनासाठी प्रत्येक वाहनाचा खर्च मिळून प्रत्येक महिन्याला दोन लाख ४३ हजार असे वर्षांला एक कोटी ४५ लाख ८० हजार रुपये खर्च येणार आहे. सर्व करांसह हा खर्च ४ कोटी ८५ लाख ६३ हजार रुपयांपर्यंत जाणार आहे.

ही यांत्रिकी झाडू वाहने विभाग कार्यालयातील घनकचरा व्यवस्थापन खात्याकडे सोपविण्यात येणार आहेत. या वाहनांनी एकत्र केलेला कचरा, राडारोडा वाहून नेणाऱ्या वाहनांच्या माध्यमातून कचराभूमीत नेला जाणार आहे. ही वाहने दोन पाळ्यांत चालणार असून प्रत्येक पाळीत चार तास काम होणार आहे. ही वाहने ताशी ६ कि.मी. या गतीने प्रतिदिन २८ कि.मी. तसेच महिना ८४० कि.मी. लांबीच्या रस्त्याची साफसफाई करणार आहेत.

पालिकेने काही वर्षांपूर्वी अशाच यांत्रिक झाडू विकत घेतल्या होत्या. त्यातील काहींचा वापर होत नसल्याचे वेळोवेळी उघड झाले आहे. वांद्रे-कुर्ला संकुल, तसेच पूर्व-पश्चिम द्रुतगती मार्गाच्या साफसफाईसाठी या यंत्रांचा वापर के ला जात होता. मात्र त्यांचा अपेक्षेप्रमाणे वापर होत नसल्याची टीकाही के ली जात होती.