देवनार कचराभूमीचा वास व त्यामुळे होणारे धूलिकणांचे प्रदूषण कमी करण्यासाठी त्यावर करण्यात येणाऱ्या सुगंधी द्रव्य फवारणीची मात्रा ५० टक्के कमी करण्यात आली आहे. दिवसातून ६०० लिटरवरून आता ३०० लिटर सुगंधी द्रव्य फवारणी केली जाणार असून त्यासाठी वर्षांला १ कोटी १५ लाख रुपये खर्च येणार आहे. स्थायी समितीत या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यावर तो अमलात येईल.
देवनार कचराभूमीचे क्षेत्रफळ १२० हेक्टर असून त्यावर शहरातील बहुतांश म्हणजे दररोज तब्बल ९५०० मेट्रिक टन कचरा टाकला जातो. पावसाळ्यानंतर कचऱ्याच्या प्रमाणात अधिक वाढ होण्याचाही अंदाज आहे. देवनार कचराभूमीत पूर्वी प्रति पाळी २०० लिटर म्हणजेच दिवसाला ६०० लिटर सुगंधी द्रव्य फवारले जात असे. यामुळे कचऱ्याची दरुगधी कमी होऊन कचराभूमीत काम करणारे कर्मचारी, तसेच आजूबाजूच्या परिसरातील रहिवाशांचा त्रास कमी होत असे. याशिवाय हवेतील धूलिकणही खाली बसत असल्याने प्रदूषणाची मात्रा कमी होत असे. या कचराभूमीवर सुगंधी द्रव्य फवारणीसाठी पालिकेने दोन ट्रॅक्टर व एक पाण्याचा टँकर वर्षभरासाठी भाडेतत्त्वावर घेण्यासाठी निविदा काढल्या होत्या. मात्र या निविदांमध्ये सुगंधी द्रव्याचे प्रमाण प्रति पाळी १०० लिटरवर आणले गेले आहे. या निविदांना मिळालेल्या प्रतिसादानुसार मे. डी. पी. इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड डेव्हलपर्स यांच्याकडून ही सेवा घेतली जाणार असून त्यासाठी पालिकेला १ कोटी १५ लाख रुपये खर्च करावे लागतील, असे पालिका प्रशासनाने प्रस्तावात नमूद केले आहे. गुरुवार, ३० जून रोजी स्थायी समितीत हा प्रस्ताव मंजूर झाल्यास त्याची कार्यवाही होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmc to spray fragrance liquid of rs 1 25 crore on deonar dumping ground
First published on: 28-06-2016 at 03:21 IST