मुंबईसह संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणी आज मुंबई हायकोर्ट अंतिम निर्णय देणार आहे. २०१३ मधील या प्रकरणातील आरोपींनी फाशीच्या शिक्षेला आव्हान दिलं आहे. आरोपींना मुंबई सत्र न्यायालयाने ४ डिसेंबर २०१४ ला या सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला आव्हान दिलं होतं. हायकोर्टाने ही याचिका फेटाळून लावली होती. आरोपींची शिक्षा निश्चित करण्यासंबंधीचा निर्णय हायकोर्टाने राखून ठेवला होता. हा निर्णय आज सुनावला जाणार आहे. त्यामुळे आरोपींची फाशी कायम राहणार की शिक्षेचे जन्मठेपेत रूपांतर होणार याचा निर्णय न्यायालय देणार आहे.

शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने विजय जाधव, कासीम बंगाली, सलिम अंसारी यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. या तिघांनी मुंबई हायकोर्टात याचिका केली आहे.

काय आहे प्रकरण?

मुंबईतील महालक्ष्मी येथील शक्ती मिल कंपाऊंडमध्ये २२ ऑगस्ट २०१३ ला एका महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला हातो. छायाचित्रकार असणारी महिला आपल्या सहकाऱ्यासोबत फोटाग्राफी करण्यासाठी गेली होती. यावेळी पाच जणांनी तिच्यावर बलात्कार केला होता.

हे प्रकरण समोर आल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापची लाट उसळली होती. पोलिसांनी याप्रकरणी विजय जाधव, कासीम बंगाली, सलिम अन्सारी, सिराज खान आणि एका अल्पवयीन मुलाला अटक केली होती. कोर्टाने सिराज खान याला जन्मठेपेची आणि इतर तिघांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. तर अल्पवयीन मुलाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.