विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृतीचे संवर्धन व्हावे यासाठी ‘राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान’अंतर्गत शालेय शिक्षणच्या मुंबई उत्तर विभाग कार्यालयाने जिल्हास्तरीय ग्रंथ महोत्सवाचे आयोजन केले आहे.
घाटकोपर येथील ‘एस. एस. एस. मल्टिपर्पज टेक्निकल हायस्कूल’च्या पटांगणावर १५ व १६ फेब्रुवारी रोजी हा ग्रंथमहोत्सव होणार असून अनेक नामवंत प्रकाशकांची दालने, कवी संमेलन, परिसंवादात साहित्यिक व कवी सहभागी होणार असल्याचे उत्तर विभागाचे शिक्षण निरीक्षक अनिल साबळे यांनी सांगितले.
जेष्ठ साहित्यिक व कवी नीरजा यांच्या हस्ते या ग्रंथमहोत्सवाचे उद्घाटन होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, आमदार राम कदम, आमदार कपिल पाटील, शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण उपस्थित राहणार आहेत.
ग्रंथमहोत्सवाच्या पहिल्या दिवशी घाटकोपरमध्ये सकाळी ग्रंथिदडी निघणार असून यात विविध शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक व पालक सहभागी होणार आहेत. सकाळी ११ वाजता मुख्य उद्घाटन सोहळा होईल. दुपारी विद्यार्थ्यांसाठी ‘लेखक आपल्या भेटीला’ या सत्रात कवी नीरजा व हमीद इक्बाल सिद्धीकी सहभागी होणार आहेत. त्यानंतर शिक्षक काव्यसंमेलनाच्या सत्रात लोकशाहीर संभाजी भगत व शिक्षककवी सहभागी होतील. सायंकाळी ४ वाजता चेंबूरच्या ‘स्वामी मुक्तानंद हायस्कूल’चे विद्यार्थी ‘मुलगी झाली हो’ हि नाटिका सादर करणार आहेत.
दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता विविध शाळांच्या विद्यार्थ्यांचे कवी संमेलन होणार आहेत. त्यानंतर ‘पुस्तकांच्या सहवासात’ या विषयावर प्रा. नीता माळी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्व सांगणार आहेत. ११.३० वाजता ‘शालेय शिक्षणात माहिती तंत्रज्ञानाचा वापर’ या विषयावर संदीप गुंड शिक्षकांना मार्गदर्शन करतील. दुपारी १.३० वाजता कथाकथनकार एकनाथ आव्हाड विद्यार्थ्यांना बालकथा सांगणार आहेत. समारोपाला जेष्ठ कवी व साहित्यिक अरुण म्हात्रे, शिक्षक आमदार रामनाथ मोते, शालेय शिक्षण विभागाच्या उपसचिव डॉ. सुवर्णा खरात उपस्थित राहणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Book festival held for mumbai schools
First published on: 13-02-2016 at 01:19 IST