मुंबई : कुण्या एकेकाळी पदपथांवर मुबलक असलेली दुर्मीळ ग्रंथदालने धुंडाळणारा मुंबईतला वाचक या विक्रीयंत्रणेसारखाच शहरातून नाहीसा झाल्याचा समज गेल्या काही वर्षांत रुजत चालला होता. त्याला एशियाटिक सोसायटीतर्फे गुरुवारपासून भरविण्यात आलेल्या जुन्या पुस्तकांच्या विक्री योजनेने मोठा छेद दिला. पंधरा दिवसांसाठी नियोजित असलेले हे ग्रंथविक्री प्रदर्शन सुरू झाल्यानंतर शेकडो पुस्तकप्रेमींच्या असोशीमुळे अवघ्या काही तासांत संपले.

पुस्तकविक्रीची माहिती वेगवेगळय़ा माध्यमांतून गेले आठवडाभर फिरत होती. त्यामुळे ग्रंथ खरेदीसाठी कॉलेजवयीन मुला-मुलींपासून कसलेल्या वाचकांची पिढी शहर आणि उपनगरांच्या कानाकोपऱ्यांतून दाखल झाली. विक्री प्रदर्शन सुरू झाल्यानंतर काही मिनिटांतच दरबार हॉलपासून लांबलचक रांग लागली. उकाडय़ाने हैराण झालेले असतानाही अपेक्षित पुस्तकांच्या चर्चा करीत दर्दीची इथली गर्दी इंचाइंचाने पुढे सरकत होती. पुस्तके घेऊन परतीच्या वाटेला लागणाऱ्यांच्या हातांत काय मौलिक दिसते, त्याचा शोध घेत होती.

एशियाटिक सोसायटीतर्फे अतिरिक्त असलेल्या, संस्थेला नको असलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन आणि विक्री संस्थेच्या दरबार हॉल येथे भरविण्यात आली होती. सुमारे चार हजार पुस्तके आणि मासिके यांचा या प्रदर्शनात समावेश होता. अत्यल्प किमतीत, २० आणि ३० रुपयांमध्ये उपलब्ध असलेली ही पुस्तके पहिल्या अध्र्या-एक तासांत पोहोचू शकलेल्या व्यक्तींनाच लाभू शकली.

   २१ एप्रिल रोजी सोसायटीच्या व्यवस्थापकीय समितीने सोसायटीला दान केलेल्या अतिरिक्त पुस्तकांची लवकरच विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला होता. परंतु पुस्तकांची विल्हेवाट लावण्यापेक्षा त्याचे विक्री प्रदर्शन भरविण्याचा निर्णय समितीने घेतला. मात्र त्यातून अजूनही शहरात जुन्या, दुर्मीळ ग्रंथांची ओढ असलेला  वाचकवर्ग किती आहे, हे लक्षात आले. 

रुमी यांचे कवितेवरील पुस्तक ‘मसनवी’ याचे बरेच खंड विकले गेले. ब्रिटानिकाच्या विश्वकोशाचे काही खंड तसेच मुंबई विद्यापीठ दरवर्षी वार्षिक दिनदर्शिका आणायचे त्याच्या काही प्रती विकल्या गेल्या. लेखक पी. जी. वूडहाऊस यांची अनेक पुस्तके आमच्याकडे होती, ती विकली गेली. अर्बिन्दो यांची पुस्तके, भारतीय तत्त्वज्ञानावरील काही ग्रंथ यांचाही समावेश असल्याची माहिती एशियाटिक सोसायटीच्या उपाध्यक्ष शेहनाज नलवाला यांनी दिली. निसर्गोपचार, अभियांत्रिकी, राशीभविष्य आणि जोतिषशास्त्र अशा विषयांवरील पुस्तकांची मागणी ग्राहकांकडून झाली असल्याचेही त्यांनी सांगितले. मराठी भाषेतीलही काही पुस्तकांबाबतही विचारणा झाली असल्याची माहिती नलवाला यांनी दिली.

अभूतपूर्व काय? गुरुवार ५ मे ते १८ मे या कालावधीसाठी सकाळी १०:३० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत पुस्तकांचे प्रदर्शन आणि विक्री करण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र विक्री सुरू होण्याआधीच शेकडो ग्रंथप्रेमी आले. पुढल्या काही तासांमध्ये चार हजार पुस्तकांची खरेदी झाली. अनेकांना रांगा लावूनही निराश होऊन परतावे लागले.

तरुणांचा प्रतिसाद पुस्तक विक्रीसाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा प्रतिसाद सर्वाधिक असल्याचे एशियाटिक सोसायटीच्या उपाध्यक्ष शेहनाज नलवाला यांनी सांगितले. विद्यार्थ्यांपाठोपाठ नोकरदारवर्ग तसेच वकिलांपासून ते अगदी गृहिणींपर्यंत विविध स्तरांतील ग्राहक मंडळींनी या प्रदर्शन-विक्रीला भेट दिली, असेही त्यांनी सांगितले.