राज्यात वाहतूक नियम मोडण्यात मुंबईकर हे आघाडीवरच राहिले आहेत. मुंबईत विविध वाहतूक नियम मोडल्याची जानेवारी ते एप्रिल २०१९ पर्यंत १ लाख ४५ हजार प्रकरणांची नोंद झाली असून त्यापाठोपाठ पिंपरी-चिंचवड आणि नागपूरमध्ये सर्वाधिक वाहतूक नियम मोडल्याचे गुन्हे दाखल झाले आहेत.

बेदरकारपणे वाहन चालवणे, वाहन चालवताना मोबाइलवर बोलणे, मालवाहतूक वाहनांमधून प्रवासी वाहतूक करणे, सिग्नल असतानाही तो ओलांडणे, मद्य पिऊन वाहन चालवणे आणि अवैधरीत्या वाहतूक इत्यादी गुन्ह्य़ांखाली वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई किंवा अनुज्ञप्ती (लायसन्स) निलंबनाची कारवाई केली जाते. यात मुंबईकरांनी तर आघाडीच घेतली आहे. महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीत, वाहतूक नियम उल्लंघनाच्या राज्यात जानेवारी ते एप्रिल महिन्यापर्यंत झालेल्या कारवाईत एकूण ३ लाख ३० हजार ८४७ प्रकरणांची नोंद झाली. यात सर्वाधिक मुंबईतच १ लाख ४५ हजार ४५९ प्रकरणे दाखल आहेत. त्यात आता आणखी वाढही झाली असेल.

सर्वाधिक गुन्ह्य़ांमध्ये बेदरकारपणे वाहन चालवण्याची ७१ हजार ७९६ प्रकरणे असून त्यापाठोपाठ सिग्नल असतानाही तो ओलांडण्याच्या ५४ हजार १९९ प्रकरणांची नोंद आहे. तर १३ हजार ७५५ प्रकरणे ही मोबाइलवर बोलताना वाहन चालवण्याची असून ऊर्वरित प्रकरणांत दारू पिऊन वाहन चालवणे व अन्य गुन्हे आहेत.

सर्वाधिक वाहतूक नियम उल्लंघन करणारी शहरे

  • पिंपरी-चिंचवड – ३८ हजार ५४२
  • नागपूर – २५ हजार ३०९
  • ठाणे शहर – १९ हजार
  • पुणे शहर – १५ हजार ३५८
  • नवी मुंबई – ८ हजार ८३०