वडाळा येथील चार रस्त्यावर भरधाव जाणाऱ्या ट्रकने मोटारसायकलीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन लहाग्यांचा मृत्यू झाला आहे. उमेरा अन्सारी (९) आणि तन्वीर अन्सारी (५) अशी या भाऊ-बहिणींची नावे आहेत. हे दोघे आपल्या काकांसोबत ईदची रोषणाई बघण्यासाठी त्यांच्या मोटारसायकलीवरून गेले होते.
वडाळ्याच्या कमलानगर परिसरात राहणारे नझीर अन्सारी (३७) आपला मुलगा सफी (५) आणि भावाची मुले उमेरा आणि तन्वीर यांना आपल्या स्कूटरवरून घेऊन गुरुवारी रात्री फिरायला निघाले होते. शुक्रवारी ईदच्या सणानिमित्त असलेली रोषणाई मुलांना दाखविण्यासाठी ते निघाले होते. रात्री साडेनऊच्या सुमारास ते वडाळ्याच्या चार रस्त्यावरून आपल्या घरी परतत होते. वडाळा स्थानकाजवळ असताना पाठीमागून येणाऱ्या ट्रकने त्यांच्या मोटारसायकलीला धडक दिली. हा ट्रक या मोटरसायकलीला ओव्हरटेक करून पुढे जात होता तर नझीर यांना वळण घ्यायचे होते. या धडकेमध्ये नझीर तोल जाऊन खाली पडले. त्या वेळी उमेरा आणि अन्सारी ट्रकच्या चाकाखाली आले. या अपघातात तन्वीर जागीच ठार झाला तर उमेराला केईएम रुग्णालयात दाखल करीत असताना रस्त्यात तिचा मृत्यू झाला. नझीर आणि त्यांचा मुलगा सफी हे थोडक्यात या अपघातातून बचावले. रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी ट्रकचालक फुलचंद प्रजापती (२२) याला अटक केली आहे. निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल करण्यात आला आहे. त्याला ७ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.