पोलीस संरक्षण असतानाही महापालिका अधिकाऱ्यांनी शुक्रवारी गांधीगिरी करीत कॅम्पाकोलातील अनधिकृत सदनिकांविरुद्ध कारवाई करू देण्यासाठी रहिवाशांची मनधरणी केली. मात्र राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांच्य पाठबळामुळे रहिवाशांनी त्यांना कम्पाऊंडमध्ये  पाऊलही टाकू दिले नाही. परिणामी कारवाई न करताच पालिका अधिकाऱ्यांना दोन वेळा माघारी परतावे लागले. मात्र शनिवारी पुन्हा एकदा कारवाई करण्यासाठी अधिकारी कॅम्पाकोलामध्ये जाणार आहेत.
कॅम्पाकोलावरील कारवाईसाठी सकाळी ११.३० च्या सुमारास पालिका अधिकारी बेस्ट व महानगर गॅस कंपनीच्या कर्मचाऱ्यांसमवेत वीज-गॅस पुरवठा खंडित करण्यासाठी गेले. तेव्हा अचानक रिपाई कार्यकर्ते निळे झेंडे फडकावित पालिकेविरुद्ध घोषणाबाजी करीत तेथे पोहोचले. शिवसेना-भाजप तसेच मनसेचे कार्यकर्तेही तेथे उपस्थित होते. ‘कॅम्पाकोलावासी आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा देत रिपाई कार्यकर्त्यांनी या परिसरात गोंधळ घातला. अखेर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांना वरळी पोलीस ठाण्यात नेले. दरम्यानच्या काळात पालिका अधिकारी रहिवाशांशी संवाद साधून कारवाई करण्यास द्यावी अशी विनंती करीत होते. तब्बल तीन तासानंतर संवाद संपुष्टात आला आणि वरिष्ठांशी चर्चा करण्यासाठी अधिकारी माघारी परतले. त्यानंतर ३.३० च्या सुमारास ते पुन्हा कॅम्पाकोलाच्या प्रवेशद्वारावर पोहोचले. परंतु रहिवाशांनी त्यांना कम्पाऊंडच्या आत येऊच दिले नाही. अखेर अधिकारी माघारी परतले.
या पाश्र्वभूमीवर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल कॅम्पाकोला रहिवाशांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्याचा तसेच न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्याची तयारी पालिकेने सुरू केली आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त मोहन अडतानी यांनी दिली.
पोलीस बळ न वापरता रहिवाशांशी संवाद साधून कारवाई करण्याचा पालिकेचा मानस होता. परंतु रहिवाशांच्या विरोधामुळे अधिकाऱ्यांना कारवाई करता आली नाही.

कॅम्पाकोलासाठी स्वतंत्र कायदा करता येणार नाही- मुख्यमंत्री
कॅम्पाकोलातील बेकायदा मजले पाडण्याची कार्यवाही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार होत असताना ती घरे वाचविण्यासाठी स्वतंत्र कायदा करता येणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. िपपरी-चिंचवडमध्ये ६६ हजार बेकायदेशीर बांधकामे आहेत. त्यांना संरक्षण देता येत नाही तर कॅम्पा कोला सोसायटीचा अपवाद कसा करणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.