अनधिकृत झोपडय़ांप्रकरणी शिवसेनेची मागणी
दहिसरमधील गणपत पाटील नगरातील झोपडय़ांविरोधातील कारवाईत अडथळा निर्माण करणाऱ्या काँग्रेस नगरसेवकांचे पद रद्द करण्याची मागणी शिवसेनेने मंगळवारी पालिका आयुक्तांकडे केली आहे. त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेसमध्ये नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत.
दहिसरच्या गणपत पाटील नगरमध्ये मोठय़ा प्रमाणावर झोपडय़ा उभ्या राहिल्या असून काँग्रेसची मतपेढी म्हणूनच तिच्याकडे पाहिले जाते. या अनधिकृत झोपडपट्टीवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक आमदार विनोद घोसाळकर आणि नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांनी केली होती. अन्यथा पालिका आयुक्तांच्या दालनापुढे उपोषणास बसण्याचा इशारा अभिषेक यांनी दिला होता. त्यामुळे गेल्या आठवडय़ात प्रशासनाने तिवरांपासून ५० मीटर अंतरावरील झोपडय़ा भूईसपाट केल्या. या कारवाईदरम्यान काँग्रेस नगरसेविका शीतल म्हात्रे आणि नगरसेवक शिवा शेट्टी यांनी पालिका अधिकाऱ्यांच्या कामात अडथळा आणला होता. त्यामुळे या दोघांचे नगरसेवकपद रद्द करावे, अशी मागणी करणारे पत्र विनोद घोसाळकर यांनी सीताराम कुंटे यांना मंगळवारी दिले.