मच्छिमार बोटीच्या दुर्घटनेप्रकरणी तटरक्षक दलाच्या ‘आयसीजी वैभव’ या जहाजाच्या कप्तान आणि नेव्हीगेशन अधिकाऱ्याविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप या दोन अधिकाऱ्यांना अटक करण्यात आलेली नाही.

गोव्याच्या बेतुल जेटीपासून १४ नॉटिकल मैल अंतरावर २५ एप्रिल रोजी हा अपघात झाला होता. यावेळी ‘आयसीजी वैभव’ या जहाजाने ‘सी मसिहा’ मच्छिमार बोटीला धडक दिली होती. या अपघातात पाच मच्छिमार ठार झाले होते आणि एक जण बेपत्ता झाला होता. ‘सी मसिहा’ बोटीला या धडकेमुळे जलसमाधी मिळाली आहे. विशेष म्हणजे ‘आयसीजी वैभव’ जहाज घटनेनंतर त्या ठिकाणी न थांबता पुढे निघाले होते. या दोन अधिकाऱ्यांच्या विरोधात यलोगेट पोलीस ठाण्यात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

तटरक्षक दलाच्या बोटीवरचा कप्तान आणि नेव्हीगेशन अधिकाऱ्यांना अटकेसाठी केंद्राची परवानगी लागते. ती पक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. ज्यावेळी हा अपघात घडला तेव्हा सी मसिहा जहाजावरील सर्व २९ खलाशी झोपेत होते. पहाटे पाचच्या सुमारास आयसीजी वैभव हे तटरक्षक दलाचे जहाज त्यावर आदळले होते.