वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता

पादचाऱ्यांना पदपथ आणि रस्त्याचा वापर सुरक्षितपणे करता यावा यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ (सीएसएमटी) परिसरातील मुख्य चौकात महत्त्वाचे बदल करण्यात येत आहेत. यात पादचाऱ्यांच्या वापरासाठी विशिष्ट रंगाने पदपथ आणि रस्त्याचा काही भाग रंगविण्यात येणार आहे. मात्र वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची विशेष दक्षता घेण्यात येत आहे.

नरिमन पॉइंट, कुलाबा, कफ परेड आणि आसपासच्या परिसरातील कार्यालयांमध्ये काम करण्यासाठी पूर्व उपनगरांमधून मोठय़ा संख्येने नागरिक सीएसएमटी स्थानकात ये-जा करतात. त्यामुळे या परिसरात कायम पादचाऱ्यांची गर्दी असते. पदपथ गर्दीने फुलून जातात, तर रस्त्यांवरही वाहतुकीला पादचाऱ्यांचा अडथळा निर्माण होत असतो. ही बाब लक्षात घेत रस्ते सुरक्षाअंतर्गत पदपथ मोकळे करण्यात येणार आहेत. तसेच पदपथांचा वापर कशा पद्धतीने व्हायला हवा हे रंगाच्या माध्यमातून पादचाऱ्यांच्या लक्षात आणून दिले जाणार आहे. मुंबई महापालिका आणि वाहतूक पोलीस पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ‘ब्लूमबर्ग फिलॅन्ट्रॉफिज इनिशिएटिव्ह’च्या (बीआयजीआरएस) सहकार्याने मंगळवारपासून प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम राबविणार आहे.

मुंबई वाहतूक नियंत्रण शाखा आणि सिटी ट्रान्सपोर्टेशन ऑफिशियल्स- ग्लोबल डिझायनिंग सिटीज इनिशिएटिव्ह यांच्या सहकार्याने  सीएसएमटी आणि पालिका मुख्यालयालगतच्या परिसरातील रस्त्यांवर पादचारीभिमुख वाहतूक व्यवस्था करण्यात येणार आहे. पदपथावर पिवळ्या (मस्टर्ड यलो) रंगाने रंगरंगोटी करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाच्या इमारतीला साजेसा रंग निवडण्यात आला आहे. या रंगाला पुरातन वास्तू समितीकडून मंजुरी देण्यात आली आहे. या भागात मोठय़ा प्रमाणावर टॅक्सींची ये-जा असते. रस्त्याच्या कडेला अस्ताव्यस्तपणे टॅक्सी उभ्या केलेल्या असतात. त्याचाही पादचाऱ्यांना अडथळा होतो. आता टॅक्सी नेमकी कोठे उभी करायची यासाठी जागा निश्चित करण्यात येणार आहे.

दोन महिने निरीक्षण

येथील पदपथाच्या रंगरंगोटीचे काम सुरू करण्यात आले आहे. या बदलाचा कितपत उपयोग होतो याची दोन महिने पाहणी करण्यात येईल. त्यानंतर या परिसरात हा उपक्रम कायमस्वरूपी राबवायचा की नाही याचा निर्णय पालिका आणि वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे.