महाराष्ट्रातील अनेक जिल्हे दुष्काळाने होरपळत असताना राज्य सरकार अत्यंत संवेदनाहीनतेने वागत असून केंद्राकडूनही कोणती ठोस मदत दुष्काळासाठी देण्यात आली नसल्याचा आरोप भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी मंगळवारी केला. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांना दुष्काळासाठी मदत मिळत नसेल तर त्यांनी सरकारमधून बाहेर पडावे, असे आवाहनही त्यांनी केले.
राज्यातील दुष्काळी भागांना भेट दिल्यानंतर मुंबईत एका पत्रकार परिषदेत बोलताना राजनाथ सिंह यांनी राज्य सरकारवर घणाघाती हल्ला चढवला. दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमाफी द्यावी व बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशा मागण्याही राजनाथ सिंह यांनी केल्या. सत्तर हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याची चौकशी होणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.
केंद्रातील काँग्रेसप्रणीत सरकारकडे लोकांचे भले करण्यासाठी कोणती दृष्टी नाही की इच्छाशक्ती नाही. देशात मुदतपूर्व निवडणुका होण्याची शक्यता असली तरी केंद्रातील सरकार अस्थिर करण्याचे काम भाजप करणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत एकच जागा असल्यामुळे नरेंद्र मोदींना घेण्यात आले असून शिवराजसिंह चौहान यांना अथवा यशवंत सिन्हा यांना वगळण्यात आल्याच्या आरोपात काहीही तथ्य नसल्याचे राजनाथ सिंह म्हणाले. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदाचा निर्णय येत्या आठवडाभरात घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.