मुंबई : मध्य रेल्वेची लोकल सेवा यार्डात जाणाऱ्या एका २४ डब्यांच्या मेल, एक्स्प्रेसमुळे सोमवारी सायंकाळी विस्कळीत झाली. दादर स्थानकाजवळ काही मिनिटे झालेल्या या घटनेमुळे लोकलच्या रांगा लागल्या होत्या. परिणामी ऐन गर्दीच्या वेळी वेळापत्रक विस्कळीत झाले.
दादर येथे २४ डब्यांची ट्रेन अचानक देखभालीसाठी काढून ती सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास यार्डात नेण्यात आली. या गाडीने कल्याणच्या दिशेबरोबरच अपला जाणारा मार्गही अडविला. या गाडीसाठी लोकल गाडय़ा थांबल्या. यार्डात जाताना बराच वेळ लागल्याने गाडय़ा खोळंबल्या. त्यातच सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलही थांबल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. साधारण पंधरा ते वीस मिनिटे झालेल्या या प्रकारामुळे दादर ते सीएसएमटी दरम्यानच्या स्थानकांत प्रचंड गर्दीही झाली. एक्स्प्रेस यार्डात गेल्यानंतर लोकल पुढे रवाना झाल्या. मात्र सायंकाळनंतर लोकलचे वेळापत्रक विस्कळीतच राहिले.