काचेच्या छताचा सर्व सुविधांनी युक्त वातानुकूलित डबा दाखल

डोंगरदऱ्यातून धावणारी ट्रेन आणि पावसाळ्यात तसेच अन्य वेळी प्रवाशांना किंवा पर्यटकांना निसर्गाचा आनंद घेता यावा, यासाठी मध्य रेल्वेच्या ताफ्यात एक ‘व्हिस्टाडोम’ (काचेचे छत असलेले) डबा दाखल करण्यात आला आहे. वातानुकूलित आणि सर्व सुविधांनी युक्त हा डबा मुंबई ते गोवा किंवा पुणे मार्गावरील एखाद्या ट्रेनला जोडण्यात येईल, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. युरोपात अशा प्रकारचा डबा असलेल्या ट्रेन चालवण्यात येतात.

काचेचे आच्छादन असलेली अशी पहिली ट्रेन विशाखापट्टणम ते आराकू व्हॅली या हिल स्टेशन दरम्यान धावत आहे. त्यानंतर अशा प्रकारचा एक डबा प्रायोगिक तत्त्वावर मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. या डब्याची बांधणी ही चेन्नईतील रेल्वेच्या इंटिग्रल कोच कारखान्यात करण्यात आली. ती पूर्ण करण्यात आल्यावर डबा मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल करण्यात आला आहे. या डब्यात ४० रोटेबल आसन असून त्या १८० टक्के रोटेबल अशा म्हणजेच हवे तसे वळण घेणाऱ्या आहेत, असे रेल्वेकडून सांगण्यात आले. काचेच्या मोठय़ा खिडक्या, १२ एलसीडी, एक फ्रिज, एक फ्रीजर, एक ओव्हन, एक ज्युसर ग्राईंडर, प्रवाशांच्या सामानासाठी जागा, निसर्ग पाहण्यासाठी स्वतंत्र जागा या डब्यात आहे. यासंदर्भात मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी सांगितले की, सध्या एकच डबा मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल झाला आहे. हा डबा जोडलेली ट्रेन मुंबई ते गोवा किंवा पुणे मार्गावरील असण्याची शक्यता आहे.